आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोप:मुंद्रा बंदरामध्ये आयात केलेल्या हजारो कोटींच्या ड्रग्जची चौकशी करा : नवाब मलिक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावन के अंधे को हरियाली दिखती है... क्रांती रेडकर यांची मलिक यांच्यावर टीका

गुजरातमधील मुंद्रा, उरणच्या जेएनपीटी पोर्टवर हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतर एनडीपीएस कायद्याखाली कारवाई का होत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.

मलिक म्हणाले, मी गेल्या ६२ वर्षांपासून मुंबईत राहतो. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे कोणीही म्हणू शकत नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असते तर पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. गृह मंत्रालय त्यांच्याकडे होते. मग ते पाच वर्षे शांत का बसले होते? माझ्यावर कारवाई का केली नाही, असे प्रश्न त्यांनी विचारले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना मलिक म्हणाले की, मुंबईत आल्यानंतर १५ ऑगस्ट २०२० रोजी वानखेडे यांनी एक गुन्हा नोंद केला. अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांना चौकशीला बोलावण्यात आले होते. या प्रकरणात १४ महिन्यांपासून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. एनसीबीचे अधिकारी माध्यमांसमोर येतात. त्यांचे शर्ट ५०० रुपये किमतीचे आहेत. वानखेडे यांचा शर्ट ७० हजार रुपयांचा असतो, प्रत्येक दिवशी ते नवे कपडे घालतात. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखांचा, बूट अडीच लाखांचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचे. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल, असे मलिक म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे मलिक यांनी सांगितले. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. तिचा मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या संपत्तीवर टाच आणून त्याला अजित पवार यांचे नाव देणे योग्य नाही. केवळ घाबरवणे, धमकावण्याचा खेळ सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

दाल मखनीचा फोटो शेअर करत क्रांतीचा मलिकांवर निशाणा
मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात नव्याने आरोप केले. समीर वानखेडे यांच्या महागड्या लाइफस्टाइलवरूनही मलिकांनी टीका केली होती. त्यावर क्रांती रेडकर यांनी ट्वीट करत मलिक यांना उत्तर दिले आहे.

क्रांतीने म्हटले आहे की,‘आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी दाल मखनी आणि जिरा राइस होता. राइस घरी बनवला होता, तर दाल मखनी बाहेरून मागवली होती आणि त्याची किंमत १९० रुपये होती. त्यामुळे मी पुराव्यांसह मीडियाला माहिती देतेय. समीर वानखेडे यांची ही संपत्ती त्यांच्या आईची आहे. ही रक्कम नक्कीच ५० किंवा १०० कोटी रुपये नाही. समीर १५ वर्षांचे असल्यापासून ही संपत्ती आहे. यासंबंधी सर्व कागदपत्रे सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नियमानुसार वेळोवेळी सरकारला दिलेली आहेत. त्यामुळे ही बेनामी संपत्ती नाही. सावन के अंधे को हरियाली दिखती है,’ अशी टीका क्रांती रेडकर यांनी मलिक यांच्यावर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...