आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीतील आणखी एका नेत्यामागे केंद्रीय तपास यत्रणांचा ससेमिरा लागणार असल्याचे दिसत आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित सेनापती घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात माहिती दिली असून लवकरच या प्रकरणात कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नेमका काय आहे आरोप?
हसन मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. जवळपास 158 कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत, असे किरिट सोमय्या यांनी सांगितले आहे. आयकर विभाग किंवा ईडीकडून त्यांच्याकडून कारवाई केली जाऊ शकते, असेही सोमय्या यांनी सांगितले. मुश्रीफ यांचे कुटुंबीय आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात याप्रकरणी केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यात फसवणूक, शेल आणि बनावट कंपनी कायदांतर्गत कारवाईची मागणी केली आहे. यात मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे 10 वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे केंद्रीय यंत्रणांना आपण दिल्याचे सोमय्यांनी सांगितले.
अनिल परबांविरोधातील याचिकेवर 16 एप्रिलरोजी सुनावणी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वादग्रस्त पोलिस अधिकारी वाझे आणि खरमाटे यांच्याकडून पैसे घेतले आणि रिसॉर्ट बांधला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणीदेखील केंद्र सरकारने दापोली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. तसेच, परब आता बॅग भरण्याची तयारी सुरू करा, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे. दुसरीकडे, रिसॉर्टचा आणि माझा काहीही संबंध नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.
आघाडी सरकारच्या अडचणी वाढणार
किरीट सोमय्या यांच्या आजच्या दाव्यामुळे अनिल परब आणि हसन मुश्रीफांविरोधात कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. तर शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची देखील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन नेत्यांवर कारवाई झाल्यास ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
पवार कुटुंबावरही निशाणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यात 1200 कोटींचा घोटाळा केला आहे. याविरोधात या कारखान्याचे 27 हजार शेतकरी मुंबईत येणार आहेत. हे शेतकरी ईडी कार्यालयात जाणार आहेत. अजित पवार, शरद पवार यांनी कुटुंबातील महिलांचा वापर या घोटाळ्यासाठी वापर केला. पवार परिवार शेतकऱ्यांना लुटणारे कुटूंब आहे, अशी टीकाही किरीट सोमय्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.