आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयएचे आराेपपत्र:उमेश कोल्हे हत्याकांडात तबलिगी जमातमधील कट्टरवाद्यांचा सहभाग, भीती निर्माण करण्यासाठी रचला कट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीमधील फार्मासिस्ट उमेश काेल्हे हत्या प्रकरणात तबलिगी जमात या संघटनेतील कट्टरवादी सदस्य सामील हाेते, असा दावा एनआयएने शुक्रवारी न्यायालयात दाखल केलेल्या आराेपपत्रात केला. प्रेषितांच्या कथित अपमानाचा सूड घेण्यासाठी हा रचलेला कट असून त्यातूनच उमेश यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही एनआयएने केला आहे. आराेपपत्रात तपास संस्थेने १७० हून जास्त साक्षीदारांच्या साक्षी नाेंदवल्या आहेत.

एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, तबलिगींच्या कट्टरवादी सदस्यांनी उमेश कोल्हे यांचा गळा चिरला हाेता. लाेकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ही कृती केली. या हत्याकांडामुळे अमरावतीच नव्हे तर संपूर्ण देशातील शांतता भंग झाली. अनेक भागांत दंगली झाल्या. दंगलीनंतर नागरिकांना नाेकरी साेडण्यासाठी धमकावण्यात आले. स्वत: च्या सुरक्षेसाठी लाेक स्वत: ला घरात काेंडून घेत आहेत. अशा दहशतवादी कारवायांमुळे देशाच्या अखंडत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी विशेष काेर्टात ११ आराेपींच्या विराेधात आराेपपत्र दाखल केले आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल देवबंदी इस्लामिक मिशनरी तबलिगी जमात इस्लामिक परंपरांच्या कडक अंमलबजावणीवर भर देतात. उमेश काेल्हे (५४) यांची २१ जून राेजी कामावरून परतताना हत्या झाली हाेती. हल्लेखाेर भाजप प्रवक्ता नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावरून उमेश यांच्या व्हाॅट्सअ‍ॅप पाेस्टवरून नाराज हाेते. नूपुर यांनी टीव्ही शाेमध्ये वादग्रस्त टिप्पणी केली हाेती.

उमेश काेल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड इस्टेट एजंट : राष्ट्रीय तपास संस्थेने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, आराेपी इरफान खान हा प्रकरणातील मास्टरमाइंड असून ताे इस्टेट एजंट आहे. हत्येच्या दहा दिवस आधी खान आणि त्याचे साथीदार मुश्तफिक अहमद व इतर साथीदार नूपुर शर्मा यांच्यावर वादग्रस्त विधानाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पाेलिस ठाण्यात आले हाेते. परंतु पाेलिसांनी याविषयी एफआयआर दाखल केला नव्हता. भाजप नेत्यावरील एफआयआरसाठी या दाेन आराेपींनी मुस्लिम समुदायाच्या विशेष बैठकीलाही हजेरी लावली हाेती.

अनेक घटनांतून मानसिकता दिसून येते : राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले की, काेल्हे यांच्या हत्येच्या आठ दिवसांनंतर उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांची २८ जून राेजी अशाच प्रकरणात हत्या झाली हाेती. त्यानंतर हत्या, अनेक सांप्रदायिक संघर्ष विविध राज्यांत घडले. त्याचे अनेक एफआयआर दाखल आहेत.

अमरावतीत २१ जूनला गळा चिरून केली होती हत्या
उमेश काेल्हे यांचा संपत्तीचा वाद नव्हता

एनआयएच्या तपासात एक प्रमुख गाेष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे काेल्हे यांचा हल्लेखाेरांशी संपत्तीवरून कुठलाही वाद नव्हता. काेल्हे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली नाही, किंवा त्यांचे एखाद्या व्यक्तीशी तसेच आराेपींशीही वैर राहिलेले नव्हते. म्हणूनच त्यामुळे काेल्हे यांची भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ व्हाॅट्सअ‍ॅप पाेस्टचा सूड घेण्यासाठी ही कृती केल्याचे दिसते, असा दावा एनआयएने आराेपपत्रात केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील पोस्टपासून झाली सुरुवात
अमरावतीतील एमआर आणि केमिस्ट्सच्या ‘ब्लॅक फ्रीडम’ व्हाट्सअॅप ग्रुपवर १४ जून २०२२ला दिवशी कोल्हेंनी नुपूर शर्मांच्या समर्थनाची पोस्ट शेअर केली. ती पाहून ग्रुपमधील युसूफ खानने त्याच्याकडील कोल्हेंच्या नंबरमधील शेवटून दुसऱ्या अंकात फेरफार करून तो कोल्हेंच्या नावाने सेव्ह केला आणि त्यानंतर पोस्टचा स्क्रीनशॉट काढला. तो ‘द अमित’ या नावाने कोल्हेंचा खरा नंबर देऊन त्यांना धडा शिकवा अन् ही अधिकाधिक पोस्ट शेअर करण्यास सांगितले. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर युसूफने अतीब रशीद याला भेटून त्याबाबत चर्चा केली. तिथूनच कोल्हे यांचा बदला घेण्याचे षड‌्यंत्र रचण्यास सुरुवात झाली.

आरोपींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत्यूची खात्री केली
उमेश कोल्हे यांच्यावरील हल्ल्यानंतर रशीद हा इरफान खानला भेटला. नंतर शेख शकीलने स्कोडा कारमधून हल्लेखोर शोएब, अतीब व शईम यांना घरी सोडले. दुसरीकडे, इरफानच्या सूचनेवरून अब्दुल अरबाज याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन कोल्हे यांचा मृत्यू झाला असल्याची खात्री केली. त्यानंतर इरफानने शोएब, अतीब, शाहरुख, तौफिक आणि शेख शकील यांना एकत्र करून मेजवानी दिली. दुसऱ्या दिवशी मौलाना मुशफिक अहमद याने कटात सहभागी आरोपींना अजमेरला फरार होण्यासाठी दहा हजार रुपये दिले.

बातम्या आणखी आहेत...