आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन:बेजबाबदार संजय राठाेड; फिजिकल डिस्टन्सिंगचा बोऱ्या, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

मानोरा (जि.वाशीम)/ मुंबई19 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपण शेण खायचे, समाजाला वेठीस धरायचे, हा नवा ट्रेंड : भाजपचा हल्ला

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर विजनवासात गेलेले वनमंत्री संजय राठोड अखेर मंगळवारी पोहरादेवी येथे जनता आणि प्रसारमाध्यमांसमोर प्रकट झाले. यवतमाळसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय नेत्यांना गर्दी टाळण्याचे आवाहन करून ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेचा फज्जा उडवत राठोड यांनी हजारो समर्थकांसह ‘बेजबाबदारी’चे प्रदर्शन केले.

राठोड यांनी कुटुंबीयांसह माता जगदंबादेवी व संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज यांच्या समाधिस्थळी, बबनलाल महाराज मंदिरात दर्शन घेतले. या वेळी हजारो समर्थक विनामास्क होते. शिवाय प्रचंड गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचाही बोऱ्या वाजला. दरम्यान, या बेजबाबदारपणाची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मानोरा पोलिस ठाण्यात ८-१० हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जाहीर केले.

माझी, कुटुंबीयांची बदनामी : राठोड
पूजा चव्हाण हिच्या मृत्युप्रकरणी मला, कुटुंबाला व समाजाला बदनाम केले जात आहे. विरोधकांकडून याप्रकरणी घाणेरडे राजकारण केले जात आहे, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस चौकशी करीत असून सत्य बाहेर येईल, असे प्रतिपादन वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे दुपारी पत्रकार परिषद घेऊन केले.

मंत्रिमंडळातील सदस्याचे वागणे बेजबाबदारपणाचे
राज्यात अन् यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात काेराेना वाढत असताना एवढ्या माेठ्या प्रमाणात समाजबांधवांना गाेळा करत गर्दी हाेणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री स्वत: ‘मी जबाबदार’ माेहीम राबवत असताना मंत्रिमंडळातील एका सदस्याने असे वागणे अत्यंत चुकीचे आहे. - मदन येरावार, माजी मंत्री.

आपण शेण खायचे, समाजाला वेठीस धरायचे, हा नवा ट्रेंड : भाजपचा हल्ला
मुंबई | शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्ष भाजपने मंगळवारी जोरदार हल्ला चढवला. मंत्र्याच्या विरोधात पुरावे समोर येऊनही काय सिद्ध होणे बाकी आहे? राज्य सरकार ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे? त्या प्रकरणावर गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही ? असा सवाल अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आपण शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, असे राठोड यांचे वर्तन आहे. राठोड हा पूजा चव्हाणांचा हत्यारा आहे, समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेंड राजकारणात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

शरद पवार-मुख्यमंत्री भेट
मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनाबाबत पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

यवतमाळ कोरोना ... मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असून, आठवडाभरात १ हजार १४८ नवे रुग्ण आढळले आहेत. मंगळवार, २३ फेब्रुवारी रोजी २४६ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. या आठवडाभरात यवतमाळ जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे.

सोमवार : २१० मंगळवार : २४६ बुधवार : १०९ गुरुवार : २३७ शुक्रवार : १२६ शनिवार : १४५ रविवार : ७५