आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
“कंगना रनौतसारख्या व्यक्तींच्या बेकायदेशीर बांधकामांना न्यायालयच अभय देणार असेल, तर या देशात अराजक तयार होईल,’ अशी भीती शिवसेना नेते, खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. हे सरकार बनवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा संजय राऊत यांनी ‘दिव्य मराठी’ला खास मुलाखत दिली, तेव्हा ते बोलत होते. ‘मी सरकारचा घटक नाही. माझे काम २८ नोव्हेंबरला सरकार स्थापन झाले, तेव्हाच संपले,’ असे राऊत यांनी सुरुवातीलाच नमूद केले.
“राज्य सरकार पडणार तर नाहीच. पण, ज्या पद्धतीने सरकारला अडचणीत आणले जात आहे, ते पाहता या सरकारच्या विरोधात एक अदृश्य शक्ती काम करते आहे,’ असे सांगत खासदार राऊत म्हणाले, “कधी ईडी, कधी कंगना, कधी अर्णब यांना बळ देणारी ही शक्ती कोणती आहे? न्यायसंस्था, ईडी, सीबीआय या सगळ्या संस्थांवर केंद्र सरकारचा दबाव असेल, तर या देशात लोकशाही उरणार नाही. श्रीमंतांच्या बेकायदेशीर बांधकामांना अभय, टीव्ही वाहिनीच्या एका मालकाला चुका करूनही अभय, मग सामान्य माणसाचे काय? महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थेच्या काही त्रुटी असतील. पण, अशा संस्थांना अडचणीत आणणे लोकशाहीच्या दृष्टीने हानीकारक आहे’ विरोधकांनी विरोध करावा, पण अंडरवर्ल्ड डॉनप्रमाने कारस्थाने केली जात असतील, तर त्याला राजकारण म्हणत नाहीत, असे सांगून राऊत म्हणाले, “यांना काहीही करू द्या. त्यामुळे उलट या सरकारला लोकांची अधिकच सहानुभूती मिळू लागली आहे.’ “लोकशाहीत एकवेळ सरकार बदनाम झाले तर चालते, पण विरोधक बदनाम होता कामा नयेत. कारण, विरोधक आहेत म्हणून लोकशाही जिवंत असते. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्यांची मोठी परंपरा आहे. पण, देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्याची प्रतिष्ठा संपवून टाकली. लोकशाहीसाठी हे मारक आहे.’, असा हल्लाही राऊत यांनी चढवला. “मुंबई महापालिकेवरचा भगवा उतरवू’, हे भाजपचे विधान लोकांना अजिबात आवडलेले नाही, असे सांगत राऊत म्हणाले, मुंबई महानगपालिका आम्हीच जिंकणार, यात काहीही शंका नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.