आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:आघाडी सरकार टिकणे कठीण, दहा दिवसांतच आघाडीचे संख्याबळ 170 वरून 151

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीत सोमवारी (जून २०) झालेल्या मतदानात सत्ताधारी महाविकास आघाडीचे (मविआ) विधानसभेतील पाठबळ चक्क १५१ पर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले. राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे संख्याबळ १६२ होते. राज्यसभेपूर्वी मविआकडे १७० संख्याबळ होते. राज्यसभा निवडणुकीत ते दहाने घटले आणि विधान परिषदेत एकूण १९ मते कमी झाली. तर, भाजपचे संख्याबळ १३४ वर पोहोचले आहे. हेच गणित गृहीत धरले तर सरकार टिकण्यासाठी बहुमताचा आकडा १४३वर येतो. मविआ आणि भाजपमधील संख्याबळात अत्यल्प अंतर राहिल्याने सरकार अडीच वर्षे टिकणे कठीण आहे.

अडीच वर्षांपूर्वी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत बहुमत प्राप्त केले होते. तेव्हा १७० आमदारांचा सरकारला पाठिंबा होता, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे १०५ सदस्य होते. १० जून रोजी राज्यसभेसाठी मतदान झाले. त्यामध्ये भाजपच्या ३ सदस्यांना पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. दहा दिवसांनंतर आज पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या ५ उमेदवारांना पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली आहेत.

त्याउलट सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा आलेख खालावत चालला आहे. राज्यसभा निवडणुकीत आघाडीच्या ४ उमेदवारांना पहिल्या पसंतीची १६२ मते मिळाली होती. आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीच्या ५ उमेदवारांना पहिल्या पसंतीची केवळ १५१ मते पडली आहेत.

सत्ताधारी आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडे ४४, राष्ट्रवादीकडे ५३ आणि शिवसेनेकडे ५५ असे एकूण १५२ सदस्य आहेत. सत्ताधारी बाकावरील बाजूला २८८ च्या निम्मे म्हणजे १४५ सदस्यांचे पाठबळ असावे लागते. आज लागलेल्या विधान परिषद निकालात आघाडीकडे काठावर बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या नाराज असलेल्या ७ आमदारांनी राजीनामा दिल्यास सरकार अल्पमतात येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...