आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव शासकीय महिला वसतिगृहात गैरप्रकार:जळगाव प्रकरणावर दिव्य मराठीची भूमिका- ‘अभ्यासू’ राजकारण्यांनो,तुम्ही तरी संयम बाळगा!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
चौकशीनंतर बाहेर पडताना सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे - Divya Marathi
चौकशीनंतर बाहेर पडताना सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
  • आरोपांत तथ्य आढळले तर संबंधितांवर आसूड ओढण्यात ‘दिव्य मराठी’ही मागे राहणार नाही हे नक्की -दीपक पटवे (निवासी संपादक)

जळगावमधील शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचण्यास भाग पाडल्याचा आरोप तेथील एका महिलेने केल्याचा मुद्दा भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत समिती नेमून चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख दिले.

जळगाव शहरातील या वसतिगृहात मुलींना मारहाण करण्यात येते आणि त्यांना कपडे काढून नाचवण्यात आल्याचा आरोप तिथेच राहाणाऱ्या एका महिलेने केला. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिचे आरोप मोबाइलमध्ये ध्वनिचित्रमुद्रित केले आणि ते समाज माध्यमातून व्हायरल केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली होती. याबाबत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, या समितीचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल. त्यानुसार संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

साडेआठ तास चालली चौकशी, गुरुवारीही समिती घेणार जबाब
सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंच्या नेतृत्वात सहा सदस्यीय समिती करतेय चौकशी
जळगाव | शहरातील शासकीय महिला वसतिगृहातील महिलेने गैरप्रकारांबाबत केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने बुधवारी तब्बल साडेआठ तास वसतिगृहात थांबून चौकशी केली. तक्रारदार महिलेचा सविस्तर जबाब घेण्यात आला असून, इतरही महिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ही चौकशी अपूर्ण असून, गुरुवारीही ती सुरू ठेवण्यात येणार आहे.मंगळवारी एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वसतिगृहातील एका महिलेने केलेले कथित गैरप्रकारांचे आरोप चित्रित केले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. जिल्हाधिकारी यांनी तातडीने अधिकारी तिथे पाठवून चौकशी सुरू केली होती. बुधवारी गृहमंत्र्यांनी विधिमंडळात घोषणा केल्यानंतर चौकशीसाठी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. तिला आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बुधवारी सकाळी साडेदहा वाजता वसतिगृहात धोडमिसे समितीने चौकशीला सुरुवात केली. समितीने तक्रारदार जननायक फाउंडेशनचे पदाधिकारी व घटनेशी निगडित महिला, युवती, वसतिगृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली. इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आले. चौकशीच्या वेळेस अधीक्षिका सुधा गिंधेवार, वसतिगृहाच्या अशासकीय सदस्या नगरसेविका सरिता नेरकर, निवेदिता ताठे, नायब तहसीलदार प्रीती लुटेदेखील उपस्थित होत्या. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही समिती वसतिगृहात होती. उर्वरित चौकशी गुरुवारी करण्यात येईल, असे तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. साडेआठ तास चालली चौकशी, गुरुवारीही समिती घेणार जवाबतातडीने लावणार सीसीटीव्ही कॅमेरेया प्रकारानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वसतीगृहात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांना दिले. त्यानुसार लगेचच ६५ हजार रुपये किमतीचे कॅमेरे आणि यंत्रणा खरेदी करण्यात आली. या वसतीगृहात येणाऱ्या पीडित महिलांचे समुपदेशन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात येते. मात्र,या प्रकरणानंतर वसतीगृहात नियमित मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी सांगितले. दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांची चोवीस तासांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे म्हणाले...
पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे, व्हिडिओ व्हायरल झाले ते फक्त आरोप करताना महिलांचे आहेत. फक्त आरोप केले जात आहेत. अश्लील व्हिडिओ तर कुठेच नाही. फक्त आरोप करणारा व्हिडिओ आल्याने इतका गोंधळ उडाला. आमच्याकडे जो आरोप करतानाचा व्हिडिओ आहे, त्याला आधार मानत पुढील तपास करणे हे आमचे काम आहे व तपास सुरू आहे.

‘अभ्यासू’ राजकारण्यांनो,तुम्ही तरी संयम बाळगा! (दिव्य मराठीची भूमिका)
जळगाव पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचारासाठी राज्यभर बदनामीच्या गर्तेत अडकताना दिसते आहे. ज्या प्रकारच्या गैरकृत्याचा आरोप शासकीय वसतिगृहातील संबंधित महिलेने केला आहे तशी कृत्ये तिथे झाली असतील तर ती करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. केवळ शहर बदनाम होते म्हणून अशा प्रकरणांवर पडदा टाकता येणार नाही; पण वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत तरी संयम बाळगण्याची नितांत गरज आहे. काही वर्षांपूर्वी अधिकारी आणि काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी कथित सेक्स स्कँडलला हवा देऊन त्याचा जो फुगा फुगवला होता, त्याने या शहराकडे पाहण्याचा बाहेरच्या नागरिकांचा दृष्टिकोनच दूषित केला होता. त्या कथित प्रकरणातून पुढे किती तथ्य समोर आले आणि न्यायालयात त्याचे काय झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आता तेव्हाच्या अधिकाऱ्यांची जागा राजकारण्यांनी घेतली आहे. काही उतावीळ इलेक्ट्राॅनिक माध्यमेही त्यांच्या जोडीला आहेत. आपण जे बोलतो आहाेत त्याचे तथ्य एकदा तपासून पाहावे, असे भानही त्यांच्यापैकी कोणाला राहिलेले नाही. भाजपच्या एका महिला आमदाराने वसतिगृहात काही पोलिसांनीच महिलांना विवस्त्र करून नाचवल्याची व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगून टाकले. त्यांचे एकवेळ समजू शकते; पण अभ्यासू म्हणवून घेणारे मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही खरोखर अशी काही क्लिप आहे का, याचीही शहानिशा करण्याची गरज भासलेली नाही आणि त्यांनीही तसेच आरोप केले. ते इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी राज्यभरच नाही तर देशभर त्याक्षणीच पसरवले. उद्या चौकशीत या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आढळले तर विरोधी पक्षनेते जळगाव पोलिसांची आणि इथल्या नागरिकांची अशीच जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतील का?ज्या दिवशी संबंधित महिलेने वसतिगृहाच्या खिडकीत उभी राहून केलेले आरोप सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी व्हायरल केले त्याच दिवशी ते ‘दिव्य मराठी’ पर्यंत पोहोचले होते. पण समाज माध्यमांतील माहितीची एकूणच विश्वासार्हता किती असते याची कल्पना असल्याने आणि प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पूर्ण खात्री झाल्याशिवाय त्या आरोपांची बातमी द्यायची नाही अशी भूमिका आम्ही घेतली. चौकशी करताना अशा काही सामाजिक कार्यकर्तींकडून माहिती मिळाली ज्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली होती. त्यामुळे ‘दिव्य मराठी’च्या वाचकांना माहितीपासून वंचित न ठेवता संयमाने आम्ही वृत्त प्रसिद्ध केले. या वसतिगृहात पीडित महिला राहतात. त्यातल्या बहुतांश हतबलतेमुळे आणि परिस्थितीच्या गर्तेत अडकल्यामुळे तिथे काही दिवसांसाठी आलेल्या असतात. अशा बातम्यांमुळे या सर्वच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्यामुळे त्यांना आयुष्यातून उठण्याची वेळ येऊ शकते याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. विशेषत: क्षणात देशभर प्रसिद्धीची ताकद बाळगणाऱ्यांना तर अशा संयमाची जास्त आवश्यकता आहे. तो संयम आपल्या नेत्यांनीही बाळगावा यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तरी आपल्या वरिष्ठांना चार गोष्टी सांगायला हव्यात. आरोपांत तथ्य आढळले तर संबंधितांवर आसूड ओढण्यात ‘दिव्य मराठी’ही मागे राहणार नाही हे नक्की. पण तोपर्यंत संयम ठेवायलाच हवा.
(दीपक पटवे, निवासी संपादक)

४ गर्भवतींना तिथून हलवले
मंगळवारी वसतिगृहातील एका पीडितीने गर्भवती महिलेला मारहाण केली होती. त्यानंतर सायंकाळी प्रशासनाने वसतिगृहातील चार गर्भवतींना मुलींच्या बालगृहात हलवले आहे. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची रात्री नेमणूक करण्यात आली आहे. वसतिगृहातही महसूलच्या महिला कर्मचाऱ्यांची पोलिसांसह नेमणूक करण्यात आली.

सुधीर मुनगंटीवार आक्रमक
आमदार श्वेता महाले यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेऊ, असे म्हटले. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला. सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. याचे या सरकारला गांभिर्य राहिलेले नाही.

आरोपात तथ्य आढळल्यास कारवाई : या प्रकरणी चौकशीमध्ये आरोपांत तथ्य आढळल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. चोवीस तास महिला पोलिसांचे पथक नेमण्यात आलेले आहे. वसतीगृहात महिलांकडे मोबाईल व इतर उपकरणे ठेवण्यास परवानगी आहे. जिल्हा व पोलिस प्रशासनाचे क्रमांक तेथे आहेत. अडचण आल्यास प्रशासन किंवा कुटुंबियांशी संपर्क साधू शकतात. आक्षेपार्ह कृती त्यासह इतर वसतीगृहात होवू नये,अशा उपाय योजना केलेल्या असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सहा सदस्यीय चौकशी समिती : सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन पाटील, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. कांचन चव्हाण, पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, पोलिस उपनिरीक्षक कांचन काळे आणि यशोदा कानसे.

बातम्या आणखी आहेत...