आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'च्याभूमिकेचे कौतुक:जळगावच्या वसतिगृहामध्ये तशी घटनाघडलीच नाही : गृहमंत्री अनिल देशमुख, ‘लोकमत’मधील बातमीने गैरसमज : गुलाबराव पाटील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव शहरातील आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचवण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

जळगावमधील आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावले व पाेलिसांनीच व्हिडिओ बनवला या घटनेत तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच चुकीची माहिती प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी वृत्तपत्रावर कारवाई करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडल्याबद्दल “दिव्य मराठी’च्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

जळगाव शहरातील आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचवण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. याबाबत भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी आवाज उठवला होता. त्यावरून बुधवारी विधानसभेत रणकंदन माजले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गृहमंत्र्यांनी सहा सदस्यीय चौकशी समिती नेमून तत्काळ अहवाल मागवला. तो विधानसभेत सादरही केला. या वेळी बोलताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अशी कोणती घटना घडलेली नाही. ‘दैनिक लोकमत’ मध्ये तशी बातमी आली आहे. त्यातून गैरसमज झाला आहे.

सवंग पत्रकारितेचा पर्दाफाश
ज ळगावच्या शासकीय महिला वसतिगृहातील कथित गैरप्रकार आणि त्यावरून कलुषित झालेल्या सामाजिक वातावरणातून मोठा धडा मिळाला आहे. समाजानेही अशा प्रकारांकडे कसे पाहावे, याचा वस्तुपाठ या प्रकरणाने घालून दिला आहे. पण त्याच वेळी, बेजबाबदार आणि सवंग बातम्यांना, एकूणच उथळ पत्रकारितेला मापदंड मानणाऱ्यांनाही या प्रकाराने आरसा दाखवला, हेही तितकेच महत्त्वाचे. अशी एकांगी आणि शहानिशा न करता केली जाणारी पत्रकारिता एखाद्या व्यक्तीची, संस्थेची वा शहराची प्रतिमा मलिन करू शकते, याचे भान राहिले नाही की अशा घटना घडू लागतात. लोकशाहीसमोरचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत असताना ज्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवावी, अशा माध्यमांनीच ताळतंत्र सोडले, तर सामान्यांचा लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावरचा विश्वासही ढ‌ळल्याशिवाय राहणार नाही. याचा परिणाम असा होतो की, विधिमंडळाचीही काही काळ दिशाभूल होते. पत्रकारिता विश्वासार्हता गमावत असताना, विकाऊ आणि दिखाऊ गोष्टींनी सभोवती फेर धरलेला असताना ‘दिव्य मराठी’ मात्र लोकांच्या बाजूने ठामपणे पाय रोवून उभा आहे.

जळगावातील घटनेच्या बाबतीतही आम्ही आमच्या स्थायीभावाप्रमाणे पत्रकारितेचे तत्त्व आणि सत्त्व जपले. हा विषय अत्यंत संवेदनशील होता. शिवाय, तो एका संस्थेच्या तसेच प्रशासन, पोलिसांप्रमाणेच समाजाच्या आणि त्यापुढे जाऊन सुवर्णनगरीचा लौकिक मिरवणाऱ्या एका शहराच्या चारित्र्याशी संबंधित होता. त्यामुळे समाजमाध्यमांतील ‘पोस्ट’ला ‘बातमी’ मानून वस्तुस्थिती जाणून न घेता सनसनाटी निर्माण करण्याच्या मोहात आम्ही पडणे शक्यच नव्हते. अशा प्रसंगात तटस्थपणा जोपासतानाच नेमकी, वस्तुनिष्ठ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. संबंधित सर्व घटकांकडे विचारणा करून, घटनास्थळी परिस्थितीचे अवलोकन करून एकूण चित्र समोर आल्यावरच वास्तव सांगणारी बातमी आम्ही प्रसिद्ध केली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर आता हेच वास्तव समोर आले आहे. समाज आणि व्यवस्थेप्रमाणेच पत्रकारितेचेही चारित्र्य आम्हाला जपता आले, हे अधिक महत्त्वाचे. केवळ घडीभर चर्चा व्हावी, झालंच तर वाचक-वर्गणीदारांच्या आकड्याची गणितं जमावी म्हणून भडक बातम्या देणे आमच्या तत्त्वात बसत नाही.

वाचकहो, स्वत:ला ‘मानबिंदू’ मानून तुमच्या मन अन् मेंदूवर अतिक्रमण करणाऱ्या गल्लाभरू ‘फेक’ वर्तमानपत्रापेक्षा, तुमच्या मनातला अढळ बिंदू होण्यातच आमच्या वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे सौख्य सामावलेले आहे. आमचा केंद्रबिंदू वाचक आहे! तुमच्यासाठीच आम्ही आहोत आणि सदैव तुमच्यासोबत आहोत. आज, या निमित्ताने पुन्हा ही ग्वाही देत आहोत. - राज्य संपादक

गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
आशादीप महिला वसतिगृहात १७ महिला राहतात. तेथील ४१ महिलांच्या साक्षी झाल्या. यातील तक्रारदार महिलेच्या पतीने पाेलिसांकडे याआधी तक्रारी दिल्या अाहेत. ती मनोरुग्ण अाहे, असेही त्यात नमूद केले आहे.

२० फेब्रुवारी राेजी वसतिगृहात गरबा, गाणी, कवितांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्या वेळी संबंधित महिलेने झगा घातलेला हाेता. गरबा करताना ताे झगा काढून ठेवला. तेथे फक्त महिलाच हाेत्या. तेथे काेणीही पुरुष नव्हते. पाेलिसही तेथे नव्हते.

नाहक वसतिगृहाची बदनामी : यशोमती ठाकूर
महिला व बालकल्याणमंत्री यशाेमती ठाकूर म्हणाल्या, जळगावातील वसतिगृहात पाेस्काे कायद्यातील, ज्यांना त्रास हाेताेय वा पीडित अशा महिलांना आश्रय दिला जाताे. अपूर्ण माहितीच्या अाधारावर आराेपांमुळे बदनामी झाली.

शहानिशा करूनच विषय मांडावे : अजित पवार
भावनेच्या आहारी जाऊन असे विषय मांडून वातावरण गढूळ करू नये, शहानिशा न करता ब्रेकिंग बातम्या देऊन बदनामी हाेत आहे. त्यामुळे सदस्यांनी माहिती घेऊनच विषय सभागृहात मांडावा, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीस यांच्याबाबतही व्हिडिओ क्लिप : पटोले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिलेची फसवणूक केल्याचा उल्लेख असलेली एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, असे नाना पटोले यांनी सांगताच एकच गोंधळ उडाला. तो व्हिडिओ व्हायरल करणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...