आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्याची घोषणा करण्यात आली असून, राज्य सरकारने तसे आदेश काढलेत. त्यामुळे आता जालना ही 29 वी महापालिका ठरणार आहे.
नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी तशी अधिसूचना जारी केली. स्टील इंडस्ट्री, मोसंबीचे आगर आणि 2010 नंतर पडलेला दुष्काळ व भयान गारपिटीमुळे जालन्याची ओळख आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राजेश टोपे आणि अर्जुन खोतकरांमुळे राजकारणातही हे शहर नेहमी चर्चेत असते.
अखेर शिक्कामोर्तब
जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करा, अशी जुनीच मागणी होती. अखेर ती पूर्णत्वास गेली आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव मागवला होता. त्यानंतर नागरिकांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या. या साऱ्या प्रक्रियेतून अखेर जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्याची घोषणा करण्यात आली. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी तशी अधिसूचना जारी करून यावर शिक्कामोर्तब केले.
स्टील उद्योगामुळे नाव
जालना जिल्ह्याने 2010 नंतर दोन ते तीन वेळेस कोरड्या दुष्काळाचा सामना केला. त्यात गारपिटीने झोडपले. तसे या जिल्ह्याची मोसंबीचे आगर ही ओळख. मात्र, दुष्काळात अनेकांनी मोसंबीच्या बागा तोडल्या आणि जाळल्या. जालना जिल्ह्यातल्या स्टील इंडस्ट्रीजची ओळख देशभर आहे. जालना जिल्हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे, दाल मिल, बी-बियाणांसाठीही जिल्ह्याची वेगळी ओळख आहे.
असा आहे जिल्हा
जालना जिल्ह्याचे २०११ च्या जनगणनेनुसार एकूण क्षेत्रफळ ७७१८ चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत ते २.५१ % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १.३२ % म्हणजे १०२ चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले ९८.६८ % म्हणजे ७६१६ चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे.
एकूण आठ तालुके
जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण आठ तालुके आहेत. आठ तालुक्यांच्या आठ तहसीलसाठी चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे. प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली आठ पंचायत समित्या कार्यरत आहेत.
जालन्याच्या बाजारपेठा
जालना जिल्ह्यातील रोजगाराचे प्रमुख साधन शेती आहे. हा जिल्हा देशात मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ५०० हेक्टर क्षेत्रावर हे प्रकल्प उभारला जात आहे. मराठवाड्यातील शेतमाल व औद्योगिक उत्पादने थेट मुंबईतील न्हावा शेवा पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ड्रायपोर्ट जवळून मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्याद्वारे उत्पादने थेट मुंबईपर्यंत पोचविली जाणार आहेत. जालना जिल्ह्यात कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, सेवली. पिंपळगाव (रेणूकाई), वालसावंगी, अंबड, घनसावंगी या बाजारपेठा प्रसिद्ध आहेत.
शैक्षणिक महत्त्व
जालना जिल्ह्यात १,५८९ प्राथमिक २१७ माध्यमिक व ३० उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत, तर दर लाख लोकसंख्येमागे ९९ प्राथमिक तर १५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४२ महाविद्यालये आहेत. त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९,३५४ आहे. एकूण ४,०७,८२९ विद्यार्थ्यांपैकी ५७.६४ % विद्यार्थी प्राथमिक शाळांत, ३९.९१ % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत तर उर्वरित २.४५ % विद्यार्थी महाविद्यालयांत आहेत. जिल्ह्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे, व माध्यमिक शाळांमधील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे.
आरोग्य सेवा
जालना जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खासगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्ह्यात १२ रुग्णालये, १२ दवाखाने व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधून १,१६३ खाटांची सोय होती. त्यात ७२,१०० आंतर रुग्ण व ७,४०,३०० बाह्य रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना यांचे अंतर्गत ८ ग्रामीण रुग्णालये आहेत. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. १,४७,००० लोकसंख्येसाठी १ रुग्णालय तर ४०,३२४ ग्रामीण लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे ७२ खाटा असे प्रमाण आढळते.
संबंधित वृत्तः
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच "चकवा'':जालना-जळगावचा ट्रॅक ऐनवेळी खामगावकडे वळवला
जालन्याच्या या सुपरकॉपपुढे अनेकांना फुटतो घाम; वाचा संपूर्ण माहिती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.