आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर:एखाद्यावेळी सूर्य पश्चिमेकडे उगवेल, पण बारामती पवारांना सोडणार नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारामतीमध्ये अनेकांनी खोदून पाहिले पण पाणी लागले नाही. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही, एवढे ते घट्ट नाते आहे, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

भाजपने काल बारामतीत बैठक घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर टीका करण्यात येत आहे.

बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती आहे. त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपला होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, बारामतीत कोणता उमेदवार द्यायचा हे भाजप ठरवेल. भाजपने सध्या बारामती आणि आमच्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. आम्ही सर्वात मोठ्या लोकांना लक्ष्य केले आहे, असे वातावरण तयार करायचे अशी भाजपाची पद्धत आहे. मात्र थोड्या दिवसात आमचीही योजना मांडू. त्यावेळी कोणकुणाला लक्ष्य करतोय हे तुमच्याही लक्षात येईल.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले, याची चर्चा करू इच्छित नाही, परंतु बावनकुळे यांनी पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे त्यांना शोभत नाही, असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला.

भाजपची लोकप्रियता कमी

सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून भाजप नेते अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली असल्याचे लक्षात आले आहे. जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते, असा हल्लाबोलही जयंतराव पाटील यांनी केला.

आव्हाडांचीही टीका

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेसाठीच्या 'मिशन बारामती' दौऱ्यावर असलेल्या भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ट्विट करत टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे. 1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगले. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही.

भाजपचे मिशन बारामती
भाजपच्या 'मिशन बारामती'ला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी 'मिशन 45' आखले आहे. पवारांना धक्का देण्यासाठी भाजपने आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर आले होते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात जाऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजरंगबलीचा आशीर्वाद घेत काटेवाडी (बारामती) येथे बूथ क्रमांक 218 समितीचा आढावा घेतला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत येऊन शरद पवारांना चॅलेंज दिले. ते म्हणाले की, राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असते.

बातम्या आणखी आहेत...