आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाण्यातील विवियन माॅलच्या चित्रपटगृहात सुरू असलेला 'हर हर महादेव' या चित्रपटाचा रात्री दहा वाजताचा शो राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वःत बंद पाडला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते विवियन माॅलच्या चित्रपटगृहात चालून गेले व त्यांनी शो बंद पाडत चित्रपट पाहू नका असे सांगत प्रेक्षकांना बाहेर काढले. यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीत स्पष्टोक्तीही दिली. पण त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी हा शो पुन्हा सुरू केला आहे. दरम्यान सोलापुरमध्येही सकल मराठा समाजाने याच चित्रपटाचा शो बंद पाडला आहे.
मनसे नेते थिएटरमध्ये
राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडल्यानंतर मनसे नेत्यांनी थेट विवियाना माॅल गाठले आणि शो पुन्हा सुरू केला. यानंतर मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा शो पाहत आहेत. अविनाश जाधव म्हणाले की, कोणाला यायचे तर येऊ द्या. मी स्वःत शोमध्ये बसणार आहे. तुम्ही मारहाण करणारे कोण? असा सवालही अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांना केला. चित्रपट संपल्यानंतर आम्ही पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करणार आहोत असेही अविनाश जाधव यांनी माध्यमांशी रात्री सांगितले.
चित्रपटगृहात शो दरम्यान राडा झाला, त्यानंतर प्रेक्षकांशी गैरवर्तन झाले असून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली तर काहींचे कपडे फाडण्यात आले आहेत. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला असून प्रेक्षक मात्र, आमच्या पैशांचे काय? असा सवाल करतानाही दिसले.
विकृत इतिहास दाखवू नका
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची ईच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू शिवाजी महाराजांविरोधात लढले हे वेडात दौडले वीर मराठे सात या चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत ईतिहास दाखवला जात आहे.
खोपकरांना काहीही बोलू द्या
आव्हाड म्हणाले, अमेय खोपकर आजारी आहेत, त्यांना काय प्रतिक्रीया द्यायची असेल तर देऊ द्या त्यांच्यावर मी जास्त बोलणार नाही. प्रेक्षकांना मारहाण एका व्यक्तीबाबत प्रकार घडला पण आमची चुकी झाली थोडे लवकर यायला हवे होते आणि प्रेक्षकांना विनंती करायला हवी होते.
पुरंदरी इतिहास
आव्हाड म्हणाले, हा सगळा पुरंदरी इतिहास आहे. पुरंदरेंनी जो विकृत इतिहास महाराष्ट्राला दिला. त्याच्याच फांद्या महाराष्ट्रात दिसत आहेत.
ऐतिहासिक संदर्भ नाहीत
आव्हाड म्हणाले, सर्वांची जबाबदारी आम्हीच घेतली असे नाही जिथे - तिथे शो बंद पाडावे. आमच्या माध्यमातून संदेश राज्यात गेला. गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा कसा असेल, मला सांगा, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. काही मुद्द्यांवर ऐतिहासिक संदर्भ चित्रपटात नाही, जे घडलेच नाही कुणी वाचलेच नाही ते चित्रपटात दाखवले गेले.
दुःख वाटते - चित्रपट दिग्दर्शक अभिजित देशपांडे
हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी प्रतिक्रीया दिली की, हालाखीच्या स्थितीत आपण मराठी सिनेमा बनवतो. राज्याबाहेरही या चित्रपटाला पाठींबा मिळत असताना आपलीच मराठी माणसे सिनेमाचा शो बंद पाडत आहे. याचे दुःख वाटत आहे.
जितेंद्र आव्हाडावर कारवाई करा - खोपकर
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, जितेंद्र आव्हाडांचा थिल्लरपणा सुरू आहे, प्रेक्षकांना मारहाण होत आहे, परिवारांसमोर मारहाण होत आहे जितेंद्र आव्हाडांना लाज वाटायला हवी. जितेंद्र आव्हाड इतिहासकार नाही. आव्हाडांवर तत्काळ कारवाई आणि अटक करावी ही मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहोत. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर कधी टीका करण्याची संधी जितेंद्र आव्हाडांना हवी आहे.
यावर आव्हाडांचा आक्षेप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.