आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज ठाण्यात राजकीय जुगलबंदीची शक्यता:जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार

ठाणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालच कोठडीतून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. ठाण्यातील कळवा खाडीवरील नव्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात या तिन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आज जोरदार राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

अटकेवरुन आरोप-प्रत्यारोप

हर हर महादेव चित्रपटावरुन जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. या चित्रपटात शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास दाखवल्याच आरोप त्यांनी केला आहे. ठाण्यात विवियांना मॉलमधील चित्रपटगृहात धुडगूस घालणे व प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. कालच त्यांचा जामीनही मंजूर झाला. यानंतर कारवाईसाठी पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला होता. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आव्हाडांवर टीका केली होती. तर, मुख्यमंत्री शिंदे यांनीही कारवाईत सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आज हे तिन्ही नेते राजकीय मंचावर एकत्र आल्यास नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सर्वपक्षीय नेते येणार

ठाणे महापालिकेने कळवा खाडीवर नवा पूल उभारला आहे. या पूलाचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूलाचे लोकार्पण होईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित असतील. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

चाणक्य कोण?

दरम्यान, काल न्यायालयात जाताना नातेवाईकांनी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आव्हाड म्हणाले होते की, मी पोलिस स्टेशनमध्ये असताना चाणक्याचा पोलिसांना वारंवार फोन येत होता. माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. मात्र, हे चाणक्य कोण? हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते.

ही तर आव्हाडांची स्टाईल- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आव्हाडांवर सडकून टीका केली होती. फडणवीस म्हणाले होते, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं, ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल आहे. त्यामुळे आव्हाड हे कायमच कुठल्याही गोष्टीचं अशाप्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना माहिती आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपटगृहात जो तमाशा केला, जी मारहाण केली, त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...