आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजो उपाशीपोटी झोपतो तोच विद्रोह करतो. उमेश खाडेचा रॅप हा विद्रोहाविरुद्ध आहे, भुकेलेल्या बापासाठी आहे. असे रॅप फक्त गरिबीत जन्माला येऊ शकते. बिल्डिंगमध्ये राहणारा मुलगा फक्त प्रेमळ कविता लिहू शकतो, या शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उमेश खाडे या रॅपरचे समर्थन केले.
रॅपर उमेश खाडे याचे 'भोंगळी केली जनता' हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या वादग्रस्त गाण्यामुळे उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते, अशी माहितीही जितेंद्र आव्हाड यांनीच काल ट्विट करून दिली होती. याप्रकरणी आव्हाड यांनी उमेश खाडेच्या घरी जात त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, उमेश खाडेचे घर 200 स्क्वेअर फिट पण नाही. वडील ड्रायव्हर आहेत. आई चार घरी धुणी-भांडी दोन घरी स्वयंपाकाचे काम करते. आईने जमवलेल्या पैशातून गाणे बनवण्यासाठी त्याला 15 हजार दिले. त्यातून त्याने गाणे बनवले.
पोलिस शिव्या देत नाहीत?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, याबाबत मी पोलिसांना विचारले, या गाण्यामध्ये असे काय आहे ज्यामुळे त्याला अटक केली, तर ते म्हणाले त्याने व्हिडिओमध्ये शिवी दिली. आता मला सांगा पोलिस जेव्हा एखाद्याला चौकशीसाठी रिमांडमध्ये घेतात, तेव्हा अरे माझ्या शोनुल्या काय केलंस, खून केला का, असे बोलतात का? पोलिस तुझ्या आईचीशिवाय बोलत नाहीत. त्याला 41A ची नोटीस दिली. हा घाबरवण्याचा प्रकार आहे.
एमपीएससीची तयारी करतोय
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आत्ता मी त्याच्या आईवडिलांना भेटलो. मुलाच्या भविष्याने ती माऊली परेशान आहे. मुलगा एमपीएससीची तयारी करतोय. त्याच्य़ावर गुन्हा दाखल झाला तर त्याचे करियर खराब होईल, हे त्या माऊलीला माहित आहे. त्याने कोणाचे नाव घेतले नाही.
भुकेलेल्या बापासाठी
जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्याने त्याची जी अदाकारी, कलाकारी होती ती सादर केली. आणि हे खूप कमी लोकांना जमते. रॅप गाणे कुमार सानू, किशोर कुमार गाऊ शकत नाही. तो ज्या वेदना दाखवतो. त्याच्या घराच्या, परिसराच्या बाबतीतली ती सत्यता आहे. जो उपाशीपोटी झोपतो तोच विद्रोह करतो. त्याचा रॅप हा विद्रोहाविरुद्ध आहे, भुकेलेल्या बापासाठी आहे. हे फक्त गरिबीत जन्माला येते.
ढसाळ विद्रोही होते
जितेंद्र आव्हाड म्हणाले, बिल्डिंगमधला मुलगा फक्त प्रेमळ कविता लिहू शकतो. मलबार हिल, वरळी येथून हा रॅप बनू शकत नाही, शिवशंकर कॉलनी सारख्या झोपडपट्टीतूनच रॅप येऊ शकते. नामदेव ढसाळ सारखा कवी हा झोपडपट्टीतून बाहेर पडला. त्यांच्या कविता आजही केंब्रिज, ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठात वाचल्या जातात. त्या जगात गाजल्या. त्यांच्या कवितेतल्या शिव्या ऐकल्या असत्या तर या सरकारने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली असती. ढसाळ विद्रोही होते. त्यांनी जखमेचे रुपांतर शब्दांमध्ये त्यांनी केले.
शूटही याच झोपडपट्टीत
जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांनी विद्रोह केला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती, त्याच्या या रॅपमध्ये वाजवणारे बाकी सर्व इथलेच आहेत. शूटही याच झोपडपट्टीत झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.