आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिक यांची प्रकृती चिंताजनक:आज सकाळी जे जे रुग्णालयाच्या ICU मध्ये हलवले, जामीन अर्जावर 5 मेरोजी होणार सुनावणी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या गुंडांकडून आणि नातेवाईकांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज मंगळवारी सकाळी त्यांना जेजे रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टर 24 तास त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी दिली आहे.

मलिक यांना सोमवारी सकाळी कमी रक्तदाब आणि पोटाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात स्ट्रेचरवरून दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी मलिक यांच्या वकिलांनी ईडीच्या विशेष न्यायालयात केली आहे.

दाऊदची बहिण हसीना पार्करकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीरोजी अटक केली आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांची तब्येत ढासळल्याने मलिक यांच्या वकिलांकडून विशेष न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ईडीने सोमवारी या याचिकेला विरोध केला होता.

मलिक यांच्या वकिलांनी आरोग्याच्या कारणावरून याचिका दाखल केल्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने ईडीला त्यांचा आरोग्य अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, या प्रकरणी सुनावणीची पुढील तारीख 5 मे निश्चित केली आहे. दरम्यान, मलिक यांची मुलगी निलोफर समीर खान हिलाही न्यायालयाने तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...