आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:लेटर बॉम्ब प्रकरणाच्या चौकशीसाठी 91 वर्षीय ज्युलिओ रिबेरो अनुत्सुक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले हाेते, या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोप प्रकरणाची ज्येष्ठ आयपीएस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांच्यासारख्याकरवी चौकशी करावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मात्र ९१ वर्षीय जे. एफ. रिबेरो या चाैकशी प्रकरणात पडणार नसल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.

या वेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेले आरोप गंभीर असल्याचे मान्य केले. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्युलिओ रिबेरोंसारख्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली.

मी ज्या अधिकाऱ्याचे चौकशीसाठी नाव सुचवले आहे, त्या रिबेरो यांच्यावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकणार नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र राजकीय साठमारीच्या प्रकरणात वयोवृद्ध रिबेरो पडण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे उद्या जरी महाराष्ट्र शासनाने रिबेरो यांना चाैकशीचे काम करण्यास रीतसर विचारणा केली तरी ते करणार नसल्याचे समजते.ज्युलिओ रिबेरो १९५३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी मुंबईचे २१ वे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात काम पाहिले आहे. रिबेरो हे सीआरपीएफचे डीजीही होते. शिवाय गुजरातचे पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

१९८९ मध्ये ते पोलिस दलातून निवृत्त झाले. पंजाबमधला असंतोष मोडून काढणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. रिबेरो यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात विशेष गृहसचिव म्हणून काम केले. पंजाब सरकारचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. निवृत्तीनंतर १९८९-९३ पर्यंत रोमानियात भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम केले. १९८७ साली रिबेरो यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘बुलेट फॉर बुलेट’ हे रिबेरो यांचे आत्मचरित्रदेखील प्रसिद्ध आहे. सध्या त्यांचे वय ९१ वर्षे आहे.

बातम्या आणखी आहेत...