आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे कुटुंबीयांचा गणपती कोकणात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. ३२० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेला हा उत्सव तब्बल २१ दिवस असतो. २१ दिवसांत श्रीगणेशाची तीन विविध रूपे येथे साकारली जातात आणि विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी या गणपतीसमोर खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजांना पिंडदानही केले जाते. पिंडदान होण्याची प्रथा असलेला कदाचित हा एकमेव गणपती असावा.
या गणपतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. देवगडहून २ किमीवरील ऐतिहासिक ‘गाबतमुमरी’ अर्थात ‘तारामुंबरी’ गावातील ‘खवळे’ या कुटुंबात गेली ३२० वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. या गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्य्रांच्या आरमारात होता. शिवतांडेलच्या लग्नाला ७ वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. अचानक एके दिवशी तो झोपेत असताना मालवण या मूळ गावातील नारायण मंदिरातल्या गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा दिली. १७०१ मध्ये या गणपतीची रीतसर स्थापना करण्यात आली, अशी माहिती खवळे घराण्याच्या नवव्या पिढीचे वारससदार आणि गणपती ट्रस्टचे कार्यवाह सूर्यकांत विष्णू खवळे यांनी दिली.
पावणेसहा फूट उंच मूर्ती : नारळी पौर्णिमेला सागराला सुवर्ण नारळ अर्पण करून मूर्तीचे काम सुरू होते. पावणेसहा फूट उंचीची ही मूर्ती खवळे कुटुंबीयांतील व्यक्तीच बनवतात. दीड टन मातीचा वापर केला जातो. गणेश चतुर्थीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगवतात. याच स्वरूपात प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा होते. पाचव्या दिवशी रंगकाम पूर्ण होते.
२१ दिवसांपर्यंत सुरू असते रंगकाम
संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी अंगरखा, पितांबर, सोनेरी मुकुट, त्यावर ५ फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी मूर्ती साकारली जाते. नंतर ७, ११, १५, १७ व २१ व्या दिवशीपर्यंत सतत रंगकाम सुरूच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे ठिपके दिले जातात. २१ दिवसांत विविध रूपे साकारणारा असा हा एकमेव महागणपती असावा. विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र लळीत अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते, तर विसर्जनाच्या दिवशी पूर्वजनांना ‘पिंडदान’ केले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.