आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना, मुंबई पालिका आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यावर सतत हल्ले चढवणारी अभिनेत्री कंगना रनौत शिवसेनेच्या पंजात अडकली हाेती. अखेर राहते घर व कार्यालय वाचवण्यासाठी कंगनाने मुंबई मनपाशी पर्यायाने शिवसेनेशी जुळते घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून कंगनाने मुंबई हायकोर्टातील बीएमसीविरोधातील याचिका बुधवारी मागे घेतली. राज्य सरकार तसेच ठाकरे कुटुंबीयांविरोधातील टिवटिव बंद करण्याच्या बोलीवर ही तडजोड झाली आहे.
सदनिकेतील बदलांसंदर्भात आमची अशील आता नागरी संस्थेेशी तडजोड करू इच्छिते. त्यामुळे दिंडोशी दिवाणी कोर्टाच्या निकालास आव्हानासाठीची याचिका मागे घेत आहोत, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी बुधवारी न्यायालयास सांगितले. त्यानंतर मुंबई पालिकेकडे बांधकाम वैधतेचा अर्ज करण्यासाठी कोर्टाने कंगनाला ४ आठवड्यांची मुदत दिली. पालिकेचा निर्णय कंगनाच्या विरोधात गेला तरी हायकोर्टात आव्हान देता यावे, यासाठी पालिकेला कारवाईच्या अंमलबजावणीस २ आठवडे स्थगितीचे निर्देश दिले, अशी माहिती पालिकेचे वकील अस्पी चिनाॅय यांनी दिली. कंगनाच्या अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेने २०१८ मध्ये नोटीस बजावली. कंगना आता बांधकाम वैधतेसाठी पालिकेकडे रीतसर अर्ज करेल. त्यानंतर सक्षम प्राधिकारी निर्णय देतील.
वाद काय : खारमधील डी. बी. ब्रिझ इमारतीत कंगनाने एकाच मजल्यावरील ३ फ्लॅट जोडले आहेत. यात मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमित केल्याचा आरोप आहे. कोर्टाने वाढीव बांधकाम अवैध असल्याचा निकाल दिला.
बदल बेकायदा : ३ फ्लॅट जोडण्याचा प्रकार अवैध आहे. दिवाणी कोर्टाने त्यावर शिक्कमोर्तब केले. यात कंगनाचा अंतिमत: पराभव होणारच होता. त्यामुळे कंगनाने माघारीचा निर्णय घेऊन तडजोडीचा मार्ग स्वीकारला आहे, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
बांधकाम वैधतेसाठी तडजोड
बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे बांधकाम वैध करण्यासाठी कंगनाला शिवसेनेची सहानुभूती आवश्यक आहे. परिणामी कंगनाला यापुढे शिवसेना, राज्यातले आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबीय यांच्याविरोधात बोलणे थांबवावे लागणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.