आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Kirit Somaiya And Nil Somaiya Vs Mahavikas Agahdi Govt, Marathi News | Action Against Somayya Father sons; The Chief Minister, Home Minister And Sanjay Raut Are Upset Over 'Varsha'

जशास तसे...:आघाडी सरकारचा काटशह; सोमय्यापिता-पुत्रांविरुद्ध कारवाईचा बडगा; मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संजय राऊत यांची ‘वर्षा’वर खलबते

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया थंडावण्यासाठी उचलली पावले

ठाकरे आणि राऊत कुटुंबीयांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अनेक बेकायदा आर्थिक प्रकरणांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्याचा निर्णय गुरुवारी (१७ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तशा सूचना त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून आघाडीच्या नेते, मंत्र्यांना भंडावून सोडणाऱ्या भाजपला आता काटशह देण्यासाठी ठाकरे सरकार सरसावले असल्याचे मानले जात आहे. सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उचलून ईडी-सीबीआयच्या कारवाईला जशास तसे उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गुरुवारी बैठक पार पडली. त्याला गृहमंत्री वळसे पाटील आणि संजय राऊत उपस्थित होते. बैठकीनंतर राऊत म्हणाले की, ‘या वेळी शिवसेना आणि महाविकास आघाडी कागदपत्रांच्या बाबतीत पक्के आणि ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांना मी कालही भेटलो होतो, याआधीही भेटलो होतो. मी त्यांना नेहमीच भेटत असतो. याचा अर्थ आहे वेट अँड वॉच.”

पवई प्रकल्पामध्ये ४३३ बोगस लाभार्थी
गृह विभाग राष्ट्रवादीकडे आहे. किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात गृह विभागाने आजपर्यंत तत्परता दाखवलेली नाही. मात्र मंगळवारच्या राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर नूर बदलला आहे. या वेळी राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांच्या आर्थिक गैरव्यहाराची कागदपत्रे गृहमंत्र्यांकडे दिली. त्यामध्ये सोमय्या भागीदार असलेल्या पवई येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) असून त्यामध्ये प्रत्येकी २५ लाख रुपये घेऊन ४३३ बोगस लाभार्थींना पात्र ठरवल्याचा राऊतांचा दावा आहे.

२११ प्रकरणे
साेमय्या पिता-पुत्रांची बेकायदा आर्थिक व्यवहारांची २११ प्रकरणे आपल्याकडे असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. त्यामध्ये सोमय्यांनी ७ हजार ५०० कोटी रुपये गोळा केल्याचा राऊतांचा आरोप आहे. या प्रकरणांच्या कारवाईला प्रारंभ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येते. आर्थिक गुन्हे शाखेकरवी या प्रकरणांची प्राथमिक माहिती गोळा करावी, असे ठरल्याचे समजते.

किरीट सोमय्या यांना सांताक्रुझ पोलिसांचे समन्स
सांताक्रुझ पश्चिम परिसरातील हसनाबाद लेन येथील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कथित बेनामी मालमत्तेची पाहणी करणाऱ्या सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी समन्स बजावले. कोविड-१९ नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांना १५ दिवसांच्या आत हजर राहण्यास सांगितले आहे. सोमय्या यांच्याविरोधात उपनगरीय सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय दंड संहितेच्या आयपीसी १८८ यासह गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पहिली कारवाई : भुजबळांच्या बंगल्याची पाहणी केल्याबद्दल सोमय्यांना पोलिसांची नोटीस

नील आणि किरीट सोमय्या
१ किरीट आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांना लगेच अटक करण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा आघाडीच्या नेत्यांवरील कारवाईसंदर्भात काय पवित्रा आहे त्यानुसार गृह विभागाने आपली कारवाई गतिमान करावी, असे तिघांच्या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

२ संजय राऊत यांना ईडीकडून केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राज्याच्या गृह विभागाने सोमय्या पिता-पुत्रांवरील कारवाई तीव्र करावी. तोपर्यंत गुन्हा नाेंदणी व इतर बाबी करण्यात याव्यात, असे आजच्या बैठकीत ठरल्याचे समजते.

रश्मी ठाकरे, मनीषा वायकरांचे कथित पत्र
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील क्र. ७८७ ते ८०५ असे १९ बंगले आपल्या नावांवर हस्तांतरित करावे, असे पत्र २३ मे २०१९ रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी कोर्लईचे सरपंच हेमंत शांताराम पाटील यांना दिले होते, असा दावा करून हे कथित पत्र सोमय्या यांनी गुरुवारी समाजमाध्यमांवर पोस्ट केले. मनीषा या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी आहेत.

हे बंगले त्यांनी अन्वय नाईक यांच्याकडून ३० एप्रिल २०१४ ला खरेदी केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. माहिती हक्क कायद्याखाली आपणास ही माहिती मिळाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...