आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना आव्हान:म्हणाले- तुमच्या व्याहींनीच मला क्लीन चिट दिली; ते विकले गेले आहेत का? हे सांगावे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

INS विक्रांत प्रकरणापूर्वी 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळा तसेच पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातही भाजप नेते किरीट सोमय्या यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यावरून किरीट सोमय्यांनी आता थेट उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनाच आव्हान दिले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीच ठाकरे सरकारच्या काळात कथित टॉयलेट घोटाळ्याची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनीच आपल्याला क्लीन चिट दिली आहे. राजेश नार्वेकर हे दुसरे तिसरे कुणी नसून खासदार संजय राऊत यांचे व्याही आहेत. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्या संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी राजेश नार्वेकरांचा रिपोर्ट खोटा होता? त्यांनी मला क्लीन चिट देण्यासाठी पैसे घेतले होते का?, हे सांगावे.

कागदपत्रेही दाखवली

आज पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी यासंबंधीचे कागदपत्रे दाखवत माझ्या या खुलाश्यामुळे संजय राऊत यांच्या घरात भुकंप येईल, असे सांगितले आहे. तसेच, माझ्यावर जे जे आरोप करण्यात आले, त्या सर्व प्रकरणांत क्लीन चिट मिळाली आहे. याबाबत मी यापुढेही धक्कादायक खुलासे करील, असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला.

मातोश्रीवर बैठक

आज पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी माझ्यवार 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या संदर्भात मातोश्रीत बैठक घेतली होती. बैठकीत अधिकाऱ्यांना हा घोटाळा उघड करण्यास सांगितले होते. बैठकीला मीरा भाईंदरचे आयुक्त, पर्यावरण सचिव मनिषा म्हैसकर, याशिवाय ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. त्यानंतर राजेश नार्वेकर यांनी मला, मेधा सोमय्या व नील सोमय्या यांना घोटाळ्यासंदर्भात नोटीस दिली होती.

उद्धव ठाकरेंना आव्हान

पुढे किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजेश नार्वेकर कोण आहेत हे सांगावे. तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अध्यक्षतेखाली 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यासंदर्भात बैठक घेतली होती की नाही हे सांगावे. संजय राऊतांकडे घोटाळ्याची कागदपत्रं कशी आली? राजेश नार्वेकर यांनी दिली की उद्धव ठाकरेंनी, असा प्रश्नही सोमय्यांनी यावेळी विचारला.

कायदेशीर नोटीशीनंतर क्लीन चिट

किरीट सोमय्या म्हणाले, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आम्हाला फौजदारी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आम्हीच त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी आम्हाला ठाकरे सरकारच्या काळातच क्लीन चिट दिली. किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठान निर्दोष असल्याची सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे होती. आम्ही कायदेशीर नोटीस दिल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी क्लीन चिट दिली.

व्याही विकले गेलेत का?

किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर राजेश नार्वेकरांवर आरोप करावेत. राजेश नार्वेकर विकले गेले आहेत हे सांगावे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठका घेतल्या की नाहीत हे सांगावे. राजेश नार्वेकर यांनी विश्वासघात केला, खोटा रिपोर्ट दिला हे सांगावे. तसेच, संजय राऊत व उद्धव ठाकरेंनीच राजकारणात घाण निर्माण केल्याची घणाघाती टीकाही किरीट सोमय्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...