आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सेव्ह आयएनएस विक्रांत' अभियानात झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एस्प्लेनेड कोर्टात (किल्ला कोर्ट) क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या क्लोजर रिपोर्टवर सवाल केला आहे. सरकार बदलल्यानंतर सर्वांचा हिशोब चुकता होईल, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.
माजी सैनिकाचा आरोप
माजी सैनिक बबन भीमराव भोसले (वय ५३) यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी एप्रिलमध्ये सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध FIR दाखल केला होता. भोसले यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, त्यांनी 2013 साली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी दोन हजार रुपये दिले. 'सेव्ह आयएनएस विक्रांत' मोहिमेद्वारे भाजपचे ज्येष्ठ नेते सोमय्या यांनी 57 हजार कोटींचा घोटाळा केला. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही या प्रकाराचा आरोप केला आहे.
पोलिसांचे काय म्हणणे आहे?
पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आयएनएस विक्रांत प्रकरणाची चौकशी केली. त्यात कोणताही गुन्हा आढळून आला नाही. कोणाचीही फसवणूक करण्याचा सोमय्या यांचा हेतू नव्हता. म्हणूनच तपासात त्यांच्या हेतू आणि कृतीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी आढळली नाही. दरम्यान, या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेसंदर्भात अंतरिम संरक्षण मिळाले आहे.
क्लीन चिट कशी मिळाली? - संजय राऊत
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी पैसे जमा झाल्याचे सर्वांनी पाहिले होते. मग तो एक रुपयाचा भ्रष्टाचार असो किंवा 50 कोटी रुपयांचा, भ्रष्टाचार हा नेहमीच भ्रष्टाचार असतो. सोमय्या यांना दिलेल्या क्लीन चिटबाबत राऊत केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहेत. सरकार बदलल्यानंतर सर्वांचा हिशोब चुकता होईल. या प्रकाराचा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी सोमय्या यांना दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.