आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची चिपळूनमध्ये पाहणी:साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका, महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले.

“तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचे बघू, ते आमच्यावर सोडा”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. “आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा”, असा टाहोच एका महिलेने फोडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचे आणि स्थानिकांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

महिलेने मांडली आपली व्यथा

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेले. होते नव्हते. सर्व गेले. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असे ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमचे सर्व नुकसान झाले. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचे बघू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

भास्कर जाधवांनी घ्यायला लावला काढता पाय

ही महिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाहून विनंती करत होती. आपली व्यथा मांडत होती. मुख्यमंत्र्यांसोबत टाहो फोडून त्यांना आपली अवस्था सांगण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही काहीही करा आमदारांचा पगार द्या. मात्र आम्हाला मदत करा. फक्त आश्वासने देऊन जाऊ नका असे म्हणत होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थोडा वेळ थांबून महिलेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधवांचे वर्तन योग्य दिसले नाही. त्यांनी महिलेच्या टाहोमागच्या वेदना लक्षात न घेता तिथून काढता पाय घेतला.

बातम्या आणखी आहेत...