आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थितीत राज्यातील स्थिती सर्वात वाइट आहे. अशात लालबागचा राजा मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही तर केवळ ‘आरोग्योत्सव’ साजरा करणार आहे. यापूर्वीच अनेक गणेश मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचे निर्णय घेतले आहेत. परंतु, लालबागमध्ये यंदा मूर्तीच न बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तरीही गणेशोत्वसाच्या 11 दिवसांमध्ये या ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
सीएम रिलीफ फंडमध्ये दान करणार पैसे
लालबागचा राजा गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी गणेशोत्सवाची रक्कम दान करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगित्याप्रमाणे, "यावेळी गणेशोत्सव साजरे करणार नाही. तसेच गणेशोत्सवासाठी असलेले पैसे मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले जाणार आहेत. यासोबतच, आम्ही एलओसी (नियंत्रण रेषा- भारत पाकिस्तान सीमा) आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा - भारत चीन सीमा) वर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार आहोत."
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. अशात गणेशोत्सवात गर्दी टाळणे शक्य नाही. त्यामुळेच, लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 87 वर्षांपासून लालबागमध्ये गणेशोत्सवाची परंपरा आहे. केवळ मुंबई आणि देशच नव्हे, तर परदेशातून सुद्धा भाविक लालबागच्या दर्शनासाठी येतात. पण, पहिल्यांदाच मूर्ती स्थापना आणि विसर्जनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच अनेक गणेश मंडळांनी मूर्तींची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा राजाची मूर्ती सुद्धा 22 फुटांची मूर्ती स्थापित न करता 3 फुटांची मूर्ती स्थापित करणार असे जाहीर करण्यात आले होते. यासोबतच, परळचा राजा गणेश मंडळाने सुद्धा आपली गणेश मूर्ती 23 फुटांची न ठेवता 3 फुटांची करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, 101 वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मंडळाने सुद्धा पोलिस आणि प्रशासनासह लोकांची दग-दग टाळण्यासाठी मंडपातच मूर्ती घडवण्याचे ठरवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.