आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लताजींचा वेदनादायी किस्सा:लता दीदींवर करण्यात आला होता विष प्रयोग, 3 महिने होत्या अंथरुणाला खिळून, विष देणाऱ्याचे नावही कळाले पण शांत राहिल्या

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर 33 वर्षांच्या असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यावेळी कुणीतरी त्यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वर्षांनी स्वतः लता दीदींनी यामागचे सत्य सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, 'आमच्या घरात आता या विषयावर चर्चा होत नाही. कारण तो आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक काळ होता. ही 1963 ची घटना आहे. विषप्रयोग झाल्याने मी खूप अशक्त झाले होते, मला अंथरुणावरून उठताही येत नव्हते. नीट चालताही येत नव्हते,' असे त्यांनी सांगितले.

मी गाऊ शकणार नाही, असे एकाही डॉक्टराने सांगितले नव्हेत
पुन्हा कधीही गाऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी म्हटले होते का? असा प्रश्न लता मंगेशकर यांना विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या, “ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी खूप आजारी झाले होते. मी जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. मात्र त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरने मला हे सांगितले नव्हते की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला या आजारातून बरे केले. तीन महिने माझे गाणे बंद होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. त्यामुळे मला उठून चालताही यायचे नाही. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.”

हेमंत कुमार रेकॉर्डिंगवर घेऊन गेले होते
बरे झाल्यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेले पहिले गाणे हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेले 'कहीं दीप जले कहीं दिल' हे होते. याविषयी दीदी सांगतात, "हेमंतदा तेव्हा माझ्या आईला भेटले. माझ्या आईने परवानगी दिली पण एक अटही घातली. मी गात असताना जराही ताण येतो आहे किंवा कोणताही त्रास होतो आहे असे जाणवले तर मला तडक घरी सोडले जावे. हेमंतकुमार यांनी ही अट मान्य केली." त्यानंतर त्यांनी 'बीस साल बाद' या चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे गाणे गायले आणि या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

विषबाधा कुणामुळे झाली हे कळले होते
विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न विचारला असता, माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळले होते, असे लता दीदींनी सांगितले. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही, कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचे आम्हाला नवल वाटले होते, असे दीदी म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...