आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटशह:विधानसभा अध्यक्षपदाची निवड पावसाळी अधिवेशनातही टळणार; राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती रोखल्याने आघाडीचे प्रत्युत्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात भेटीगाठींचा सिलसिला सुरूच; संजय राऊत-आशिष शेलार खलबते
  • आघाडीचा निर्णय : उद्यापासून मुंबईत दोन दिवसांचे अधिवेशन

गेले ४ महिने रखडलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्यपाल आणि भाजप यांच्या दबावाला सरकार भीक घालत नसल्याचे दाखवण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आघाडीच्या समन्वय समितीत झाला असल्याचे सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जशी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची शिफारस प्रलंबित ठेवली आहे, तसे आम्हीसुद्धा विधानसभा अध्यक्षपद प्रलंबित ठेवू शकतो, हे आघाडीला दाखवायचे आहे.

फेब्रुवारीत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त आहे. दोन अधिवेशने झाली, पण अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी सरकारला पत्र पाठवून अध्यक्षाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. ५ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यपालांनी सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची आठवण दिली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षपद निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी केली होती.

शरद पवारांनी प्रशस्तिपत्र दिलेल्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात अधिवेशनात प्रस्ताव
काही तरतुदी वगळता केंद्राचे कृषी कायदे चांगले असल्याचे प्रशस्तिपत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर आता आघाडी सरकार अधिवेशनात कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडणार अाहे. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात कृषी कायद्यांना विरोध करणारा ठराव मंजूर केला जाणार आहे.

राज्यात भेटीगाठींचा सिलसिला सुरूच; संजय राऊत-आशिष शेलार खलबते
राज्यात गुप्त भेटींचा सिलसिला वाढला असून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यात शनिवारी गुप्त भेट झाली. मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी होत आहेत.

सोमवारी हजर राहण्याचे आदेश - देशमुख पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स
मुंबई |मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहे. अनिल देशमुखांना ५ जुलै, तर मुलास ६ जुलैची तारीख दिली आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी माजी गृहमंत्र्यांना शनिवारी तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. वयोमानपरत्वे कोरोनाचा धोका असल्याचे कारण पुढे करीत अनिल देशमुख (७२) यांनी यापूर्वी दोन वेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे टाळले आहे. देशमुख यांच्या या प्रकरणाव्यतिरिक्त बोगस कंपन्यांमधील गैरव्यवहारांसंबंधात देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश व कुटुंबीयांची चौकशी होणार आहे.

परबही ‘ईडी’ रडारवर
शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही ईडीकडून कधीही कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अनेक नेते व मंत्री हादरले असून आघाडीत चलबिचल सुरू आहे.

अशा भेटी होत राहतात
राजकारणात अशा भेटी होत राहतात. आम्ही आमचे काम करत राहू. शिवसेनेने हात पुढे करण्याचा विषय नाही आणि तशी शक्यताही नाही. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजपच्याच पावलावर पाऊल
मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ सरकार उलथवून भाजपचे शिवराजसिंह चौहान सरकार आले. तिथे १० महिने हंगामी अध्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहत होते. त्यामुळे आपणसुद्धा घाई करायची नाही, असे आघाडीच्या समन्वय समितीत ठरल्याचे एका नेत्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...