आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अर्ज भरताना उमेदवाराने किमान 10 वृक्ष लावावे; विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांची पत्रकार परिषदेत सूचना

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने आपल्या मतदारसंघात किमान १० वृक्षांची लागवड करणे आवश्यक राहील, अशी अट टाकावी, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, जागतिक तापमानवाढ मोठी समस्या आहे. त्यामुळे आज अतिवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या आपत्तींना सर्व जग सामोरे जात आहे. यामुळे भविष्यामध्ये अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार आहे. मानवी जीवन धोक्यात येऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. वातावरणीय बदलाचे परिणाम आता आपण प्रत्यक्ष अनुभवू लागलो आहोत. यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा असून हे बदल रोखण्यासाठी उपाययोजना राबवताना लोकसहभाग अत्यंत गरजेचा असून लोकप्रतिनिधींनी देखील हा विषय समजून घ्यावा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा.

सध्याची परिस्थिती पाहता वातावरणीय बदल या विषयाचे गांभीर्य प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढ या विषयासंदर्भात लोकप्रतिनिधींना ज्ञान मिळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी देखील हा विषय समजून घ्यावा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा. येत्या नागपूर अधिवेशनात या विषयावर सखोल चर्चा करण्यात येईल. जागतिक तापमानवाढीबद्दल लोकप्रतिनिधींमध्ये जागरुकता व्हावी यासाठी वातावरणीय बदलासंदर्भात विधानमंडळ तदर्थ समिती आहे. पुढील अधिवेशनापर्यंत तदर्थ समिती नियमित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही झाली असून ती पुढील अधिवेशनात पुर्ण होईल.

वातावरणीय बदलांसंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त तदर्थ समितीची बैठक सभापतींच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित करण्यात आली. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. वाढत्या वायू प्रदूषणामुळे तापमान वाढ होत असून ते कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशा शिफारशीही बैठकीत मंजूर आल्या.

आमदार निधी खर्चास अनुमती द्यावी
पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी आमदार निधीतून (स्थानिक विकास निधी) ठराविक प्रमाणात रक्कम खर्च करण्यास अनुमती देण्यात यावी. पर्यावरण रक्षण आणि निसर्ग समतोल यासाठी नगरविकास, वने, महसूल, पर्यावरण,परिवहन उद्योग व ऊर्जा अशा सर्व विभागांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पर्यावरण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...