आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठराव संमत:केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रति महिना 3 कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत, आरोग्यमंत्र्यांनी मांडला ठराव

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड-19 महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत राज्यातील लोकसंख्येचे लसीकरण केंद्र शासनाच्या धोरणानुसार करण्यात येत आहे.

राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा ठराव मांडला.

काय आहे हा संपूर्ण ठराव?

टोपे यांनी मांडलेल्या या ठरावात म्हटले आहे की, राज्यात अद्याप कोविड संसर्गाची स्थिती आहे. त्यातच नव्याने डेल्टा प्लस रुग्ण व म्युकरमायसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वाला आळा घालण्यासाठी व संभाव्य तिसरी लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. मोठ्या प्रमाणावरील लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण होईल. दिनांक २६ जून २०२१ रोजी राज्यामध्ये एका दिवसात ७,३८,७०४ लोकांचे लसीकरण केले असून दिनांक ३ जुलै २०२१ रोजी एका दिवसात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे.

महाराष्ट्र राज्याची दैनिक लसीकरणाची क्षमता ही १० ते १५ लाखाच्या दरम्यान असल्याने केंद्र शासनाने प्रत्येक महिन्यास किमान 3 कोटी लसीचे डोस राज्यास उपलब्ध करून दिल्यास राज्याचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करता येईल. यासंदर्भात राज्यातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतची मागणी आहे. हे लसीकरण लवकर पूर्ण झाल्यास जनतेमधील सामूहिक प्रतिकार शक्ती (Herd Immunity) मोठ्या प्रमाणात विकसित होईल व या आजाराची तीव्रताही कमी होईल. तसेच आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल. तसेच स्तर-३ चे निर्बंध कमी करता येतील. राज्यातील व्यवहार पूर्ववत सुरू करणे शक्य होईल. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

कोविड-19 महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत राज्यातील लोकसंख्येचे लसीकरण केंद्र शासनाच्या धोरणानुसार करण्यात येत आहे. राष्ट्रव्यापी कोविड- 19 प्रतिबंधात्मक लसीकरण धोरणाची अंमलबजावणी दिनांक 16 जानेवारी, 2021 रोजी राज्यात सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम टप्प्यात आरोग्य सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि कोविड-19 साथरोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम अंमलबजावणीसाठी नियुक्त कर्मचारी यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. द्वितीय टप्पा दिनांक 1 मार्च, 2021 पासून सुरू करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण व 45 वर्ष वयोगटावरील सहव्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दिनांक 1 एप्रिल, 2021 पासून 45 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिनांक 1 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील जवळपास 5.71 कोटी लाभार्थ्यांचे कोविड 19 लसीकरण करण्याबाबत केंद्र शासनाने घोषणा केली होती. दिनांक 1 मे, 2021 पासून खुल्या दराचे राष्ट्रीय कोविड 19 वेगात्मक लसीकरण धोरण लागू झाले आहे. तसेच केंद्र शासनाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील कोविड 19 लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्या घराजवळ कोविड लसीकरण केंद्र घेतले जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडलेल्या खाजगी रुग्णालयांत आणि औद्योगिक आस्थापनेच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र घेतले जातात. दिनांक 21 जून 2021 रोजीच्या केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशांतर्गत लस निर्मात्याकडून मासिक लस उत्पादित केलेल्या एकूण उत्पादनापैकी 75% लस केंद्र शासनाकडून खरेदी करून राज्याला पुरविली जात आहे. उर्वरीत 25% लस खाजगी रुग्णालयाला खरेदी करता येईल असा निर्णय झाला आहे. तसेच 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना लस पुरविण्याची जबाबदारी केंद्र शासनाने घेतल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

राज्यात 05 जुलै 2021 पर्यंत केंद्र शासनाकडून लसीचे २,८४,३९,०६० डोसेसचा पुरवठा झाला आहे. तर राज्य शासनाने २५, १०,७३० लसींचे डोसेस खरेदी केले आहेत. 5 जुलै पर्यंत राज्यात एकूण ३,४३,८२,५८३ लाभार्थ्यांना लसीकरण झाले आहे. यामध्ये खाजगी रुग्णालयांनी प्राप्त केलेल्या लसींचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात लसीकरणामध्ये अव्वल स्थानावर असून त्यानंतर लोकसंख्येने सर्वाधिक असणारे उत्तर प्रदेश ३.२६ कोटी लसीकरणासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर लसीकरण झालेल्या राज्यांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे. (३) गुजरात २.६८ कोटी, (४) राजस्थान २.५८ कोटी, (५) कर्नाटक २.३८ कोटी (६) पश्चिम बंगाल २.२७ कोटी, (७) मध्य प्रदेश २.१६ कोटी याशिवाय इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाया जाणाऱ्या लसींचे प्रमाण हे देखील अत्यंत कमी व नगण्य आहे, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

टोपे म्हणाले की, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण ४,२५,४२,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,९८,१७७ (१४.३३%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यामध्ये आज अखेर एकूण १,२३,०३० एवढे मृत्यू झालेले आहेत. तसेच राज्यात आज रोजी एकूण १.२३.२२५ अॅक्टिव्ह रुग्ण असून हे देशात सर्वात जास्त आहेत. डेल्टा प्लस या व्हेरियन्टचे एकूण 21 रुग्ण राज्यात आढळले असून ते अनुक्रमे रत्नागिरी-९, जळगाव-७, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग व रायगड (प्रत्येकी १) असे जिल्हानिहाय रुग्ण आढळले आहेत. राज्याने कोविड-१९ च्या आजारावर मात करण्यासाठी टेस्टिंग (Testing), ट्रेसिंग (Tracing), उपचार (Treatment) या त्रिसूत्रीचा अवलंब केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...