आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी हल्ल्याची धमकी:मुंबईत पुन्हा 26/11 घडवू; पाकमधून आले धमकीचे मेसेज, एक अटकेत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत पुुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करू, अशी धमकी देणारे संदेश मुंबई पाेलिसांच्या कंट्राेल रूमला मिळाले. हे मेसेज पाकिस्तानातून आल्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान, एटीएसने विरारमधून एकाला अटक केली असून तो मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संदेशात म्हटले की, आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. या वेळीही २६/११ सारखा हल्ला करू. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही लाेक आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. माझे लोकेशन पाकमध्ये येईल, पण काम मुंबईत होईल. आमचा ठिकाणा नसतो. या कामासाठी ६ जण कार्यरत आहेत. अल कायदा या संघटनेचाही उल्लेख यात करण्यात आला आहे.

तेव्हा १९७ जण मारले गेले
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याच्यासह १० जणांनी मुंबईवर हल्ला केला होता. यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात मुंबई पोलिस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले होते. अतिरेक्यांनी एकूण ८ जागी हल्ले केले होते. मुंबई पोलिस दलातील हेमंत करकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यात शहीद झाले होते.

पंजाब पोलिसांची गाडी बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शिर्डीत अटक
पंजाबात एका पोलिस अधिकाऱ्याची गाडी बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दहशतवादविरोधी पथकाच्या सहकार्याने शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले. रजेंदरकुमार ऊर्फ बाऊ रामकुमार वेदी (हरी, ता. पट्टन, जि. तरणतारण, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. रजेंदरकुमार हा हरपालसिंग व फत्यदीपसिंग या साथीदारांच्या मदतीने पंजाबमधील पोलिस उपनिरीक्षक दिलबागसिंग यांच्या चारचाकी गाडीखाली बॉम्ब ठेवून फरार झाला होता. मालदीवला पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, कोविड रिपोर्ट नसल्याने विमानाचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे तो दिल्लीतून मंगला एक्स्प्रेसने नांदेडला जाण्यासाठी निघाला. मात्र, ही रेल्वे नांदेडला जाण्याऐवजी मनमाडला पोहोचली. तेथे एक दिवस लॉजवर मुक्काम करून तो साई दर्शनासाठी शिर्डीला आला. येथे तो मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या हॉटेल गंगा कॉन्टिनेन्टल येथे रूम नं. ३९२ मध्ये उतरला होता. रजेंदरकुमारच्या मागावर असलेल्या पंजाब दहशतवादविरोधी पथकाला याबाबत सुगावा लागताच त्यांनी नगर जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने शिर्डी पोलिसांना सूचना देत एटीएसला कळवले. त्यानंतर दहशतवादविरोधी पथक व शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रजेंदरकुमारला ताब्यात घेतले. या आरोपीवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वयेसुद्धा गुन्हा दाखल आहे. आरोपीला अमृतसरचे पोलिस अधिकारी समशेरसिंग, जलनजितसिंग, जर्मनजितसिंग यांच्या ताब्यात देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...