आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:राज्यातील लॉकडाऊन उठवा, मंत्र्यांचा आग्रह; दुकानाच्या वेळा 2 पर्यंत होणार; 2 डोस घेतलेल्यांना सवलत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द, टास्क फोर्सची आज बैठक

राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असल्याने लाॅकडाऊनच्या काही नियमांत शिथिलता द्यावी, किमान दुकानाच्या वेळा रात्री ८ पर्यंत तरी करा, अशी आग्रही मागणी बहुतांश मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सहमती दिली असून दोन दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा एकंदर मूड पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारचा कोल्हापूर जिल्ह्याचा पाहणी दाैरा स्थगित केला असून गुरुवारी कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.

बुधवारी सह्याद्री अतिथिगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यावर चर्चा झाली. या वेळी आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यापारी व दुकानदारांच्या अडचणींचा पाढा वाचला. दुकानाची वेळ किमान रात्री ८ पर्यंत तरी करा, आठवड्यातील दोन दिवसांचा लाॅकडाऊन एका दिवसावर आणा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. त्याला अनेक मंत्र्यांनी दुजारो दिला.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाच्या काही अटीतून शिथिलता द्यावी, अशी मागणी केली. तसेच मुंबईतील उपनगरीय रेल्वेत सामान्यांच्या प्रवेशाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात उद्याच कोरोना टास्क फोर्सची बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मंत्र्यांना आश्वस्त केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्ण शिथिलता शक्य नाही
राज्यातील ८ जिल्ह्यांत पूरग्रस्त स्थिती आहे. अशा जिल्ह्यात बचाव पथके बाहेरून गेली आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. आपण सध्या पूर एके पूर याकडे पाहतो आहोत. मात्र राज्यातील कोरोना संपलेला नाही, त्यामुळे लगेच पूर्ण शिथिलता शक्य नाही,असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

राजेश टोपे म्हणाले, तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण शक्य
केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. ही तिसऱ्या कोरोना लाटेची नांदी आहे. तिसऱ्या लाटेत राज्यात ६० लाख रुग्णसंख्या असू शकते. कोरोना प्रतिबंधाचे नियम आणि जास्तीत जास्त लसीकरण यामुळे तिसरी लाट शक्य तितकी थोपवून धरली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...