आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावाकडच्या इलेक्शनचा धुरळा:मंत्री संदीपान भुमरेंना धक्का; इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई अन् पडळकरांच्या आई कारभारीन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवताच विजयी उमेदवारांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला.

महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आज अनेक धक्कादायक निकाल लागले. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द पालकमंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन आणि आडूळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरस्कृत पॅनलची सत्ता आली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील मोहाडी या ग्रामपंचायतीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत झाले. राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज हाती आलेत.

अकोला ग्रामपंचायत निवडणूक: 265 ठिकाणी गाव कारभारी निश्चित

Live Update

इंदोरीकरांच्या सासूबाई सरपंच

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी संगमनेरच्या नीळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. तर दुसरीकडे भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री यांनी सांगलीमधील पडळकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी बाजी मारली आहे.

ग्रामपंचायतीचे दोन इंटरेस्टिंग निकाल:गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री अन् इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई झाल्या कारभारीन

आमदार गुट्टेंना धक्का

आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या दैठणा घाट गावची ग्राम पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या ताब्यात आलीय. परळी तालुक्यातील आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायती पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने सर्वाधिक २८ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाला फक्त १२ ठिकाणी विजय मिळाला.(सिल्लोड तालुक्यातील हट्टी मोहाळ येथील विजयी उमेदवार.)

ठाकरे सेनेची सरशी

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन आणि आडूळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरस्कृत पॅनलची सत्ता आली आहे. आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी झालेत.(शेलुद (ता. भोकरदन) ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार.)

मंत्री संदीपान भुमरेंना पैठणमध्ये अंबादास दानवेंकडून धक्का:बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच; धर्में, भावलेंची सरपंचपदी बाजी

मोहाडीत भाविनी पाटील पराभूत

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील मोहाडी या ग्रामपंचायतीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत झाले. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्या सरपंच होत्या. त्यांच्यासमोर प्रा. शरद पाटील यांचे पॅनल उभे होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा टिकाव लागला नाही.

जळगाव ग्रामपंचायत निवडणूक:गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत

(बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत सुरेश धस समर्थकांचा विजय.)

गडाख गट वरचढ

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचे निकाल पहिल्या टप्प्यात जाहीर झाले. येथील बहुतांशी ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच हे आमदार शंकरराव गडाख गटाचे आहेत. तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या कांगुनी ग्रामपंचायतीवर भाजपचे 11 पैकी 8 सदस्य निवडून आले. गडाख गटाचे सरपंच पदासह 4 सदस्य निवडून आले...नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

त्रिकोळीमध्ये ग्रामविकास परिवर्तन

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या त्रिकोळी (ता. उमरगा) येथे सर्वपक्षीय ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे दहाच्या दहा उमेदवार निवडूण आले. सर्व उमेदवार दोनशे मतांच्या फरकाने विजयी झाले. सरपंच पदाच्या उमेदवार मुद्रिकाबाई शंकरबावा सुरवसे यांना ११८० मते पडली. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कस्तुरबाई काळे यांना २९९ मते पडली. त्यात मुद्रिकाबाई सुरवसे यांचा ८८१ मतांनी दणदणीत विजय झाला. (उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथे सर्वपक्षीय ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी.)

नाथ्रात मुंडेंची सरशी

भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी असणाऱ्या नाथ्रात (ता. परळी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे विजयी झालेत. या ठिकाणी धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत भावा-बहिणीचे फोटोही एकाच बॅनवर पाहायला मिळाले. सरपंच पदासाठी मुंडेंचे चुलत भाऊ अभय मुंडे रिंगणात होते. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार गौतम आदमाने आव्हान होते. मात्र, हे आव्हान त्यांनी लिलया पेलले.

परळीत नाथ्रासाठी मुंडे बहीण-भाऊ एकत्र:पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे यांचे चूलत बंधू अभय मुंडेंची सरपंचपदी निवड

(उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील विजयी उमेदवार.)​​​​​​

बारामती तालुक्यातल्या 13 ग्रामपंचायती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या ताब्यात गेल्याचा दावा करण्यात येतोय. गडदरवाडीत भाजप पुरस्कृत पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. तर पणदरे येथे राष्ट्रवादी पुरस्कत पॅनलला सात जागा आणि सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला. या ठिकाणी विरोधकांना आठ जागा मिळाल्या. सदोबाचीवाडी, कुरणेवाडी येथे बारामती तालुका संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना पराजयाला सामोरे जावे लागले.(विजयी उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवाद केले.)

करवीर तालुक्याचे (जि. कोल्हापूर) चित्र

हिरवडे खालसा येथे काँग्रेस आणि शेकापचे नदीफ मुजावर यांनी बाजी मारली. गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे, तर सावर्डे दुमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी झाले. सडोली दुमाला येथे काँग्रेसचे अभिजित पाटील, तर कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम यांनी बाजी मारलीय.चिंचवडे तर्फ कळेमध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर, तर हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव या विजयी झाल्यात. सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील, सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ, पाडळी बुद्रुकमध्ये स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड, परितेत काँग्रेसचे मनोज पाटील, दिंडनेर्लीत स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे, कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील, नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर, सादळे मादळे येथे स्थानिक आघाडीचे पंडित बीडकर, वळिवडेत काँग्रेसच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे तर प्रयाग चिखलीत भाजपचे रोहित रघुनाथ पाटील यांनी बाजी मारलीय.

माहुलीत शिंदेंची बाजी

पैठण तालुक्यात क्षेत्र माहुली या अती संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी बाजी मारलीय. या ठिकाणी आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात होती जोरदार चुरस होती.​(उस्मानाबाद जिल्ह्यातील कलदेव लिंबाळा येथील विजयी उमेदवार.)

हेरवाडमध्ये स्वाभिमानी आघाडी

औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. कोल्हापूरमधील हेरवाड ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस आघाडीने विजय मिळवला आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. नांदेड जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसने 4 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना हा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीत सुरुवातीच्या मतमोजणीनुसार भाजपला विजय मिळाल्याची माहिती आहे. येथे समरजित घाटगे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलला विजय मिळाला असून 5 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ गटाला येथे धक्का बसल्याचे मानले जात आहे.​​​

एका ठिकाणी 'आप'

​​​ उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी ग्रामपंचायतीवर आम आदमी पक्षाने आपला झंडा फडकावला आहे. येथे अ‌ॅड. अजित खोत विजयी सरपंचपदासाठी विजयी झाले आहेत. तसेच, जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. 590 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. कोल्हापूरमधील 43, सांगलीत 28, रायगडमध्ये 50, बीडमध्ये 34 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

कराड तालुक्यातील निकाल

तारुख ग्रामपंचायतीत अपक्ष सरपंच विजयी; भाजप, कॉग्रेसला धक्का. चोरजवाडी ग्रामपंचायत तटस्थ गटाकडे. घोलपवाडी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा विजय. वनवासमाची ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचा विजय. तारुख ग्रामपंचायतीत भाजप, कॉग्रेसला धक्का; अपक्ष सरपंच उमेदवार सचिन कुराडे विजयी. अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय. मनव /येळगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रीय काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम. दुशेरे आणे येथे भाजपाच्या डॉ. अतुल भोसले यांची तर हिंगनोळी, हेळगाव पाडळी, अंतवडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम. पश्चिम सुपने येथे राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच, दोन सदस्य विजयी. रयत आघाडीचे 4 सदस्य विजयी. समसमान मतामुळे चिठ्ठीद्वारे निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार. किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 12 जागांवर विजय मिळवलाल आहे. भाजप आणि शिंदे गटाला एकरी जागा जिंकता आली नाही. चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम. पतंगराव माने गटाचे 10, तर सुरेश माने गटाचे 3 विजयी. सरपंच देवदत्त माने विजयी

औरंगाबादेत 8 ग्रामपंचायती बिनविरोध

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, खुलताबाद, कन्नड, गंगापूर, सोयगाव, वैजापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तालुक्यांतील २१९ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यात फुलंब्री तालुक्यातील तीन सरपंचांसह २१ सदस्य बिनविरोध आहेत. त्यामुळे उर्वरित २११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सरपंचपदासाठी ४६३, तर सदस्यपदासाठी २९७८ उमेदवार रिंगणात आहेत.

बीड : आमदारांची प्रतिष्ठा पणाला

बीड जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार असलेले त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात राजुरी ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे. तर, पंडितांची राजधानी समजल्या जाणाऱ्या गेवराई तालुक्यातील दैठण गावात माजी मंत्री बदामराव पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. यात कोण बाजी मारते याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(उस्मानाबाद जिल्ह्यातील कोराळ येथील विजयी उमेदवार.)

उस्मानाबाद : राणांच्या गावात तिरंगी लढत

उस्मानाबाद जिल्ह्यात १६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून यातील सहा ग्रामपंचायती प्रतिष्ठेच्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यात या टप्प्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्या तरी तेर गावात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तेर गावात तिरंगी लढत होत आहे. यात कोण बाजी मारते याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जालना : जवखेडा खुर्दची बिनविरोधची प्रथा मोडीत

जिल्ह्यातील बदनापूर तालुका वगळता जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील २५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव असलेली जवखेडा खुर्द ही ग्रामपंचायत ३० वर्षांपासून बिनविरोध होण्याची प्रथा होती. यंदा ही प्रथा मोडीत निघाली.

हिंगोली : वारंगाफाटा, मसोडमध्ये दुरंगी लढत

हिंगोली जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १६, सेनगाव तालुक्यातील १०, कळमनुरी तालुक्यातील १६ औंढा तालुक्यातील ७, तर वसमत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा, मसोड, कांडली या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमधून दुरंगी लढत होणार आहे.

परभणी : जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायती बिनविरोध

जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यात परभणी तालुक्यातील २९, गंगाखेडमधील १२, जिंतूर ३३, मानवतमधील ७, पालममधील ११, पाथरी मध्ये ७, पूर्णा तालुक्यातील १३, सेलूमधील ११ व सोनपेठ तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. यातील केवळ ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. १ हजार ९० जण सदस्यपदासाठी मतदान आहे.

हे वृत्त सातत्याने अपडेट होत आहे...

बातम्या आणखी आहेत...