आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौलाना आझाद महामंडळामार्फत अभिनव योजना:अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसह महिला बेरोजगारांना 30 लाखांपर्यंत कर्ज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबवण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांनी केले आहे. महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

योजनेबद्दल संकेतस्थळावर माहिती : या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनांचे अर्ज महामंडळाच्या http://www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांकदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

परदेशात शिक्षणासाठी ३० लाख : शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये देशातील शिक्षणासाठी २० लाख रुपयांपर्यंत तर परदेशातील शिक्षणासाठी ३० लाखांंचे कर्ज देण्यात येते. यासाठी क्रेडिट लाइन १ अंतर्गत शहरी भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारांपेक्षा कमी व ग्रामीण भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ९८ हजारपेक्षा कमी आहे, त्याला फक्त ३ टक्के वार्षिक व्याजदराने हे कर्ज देण्यात येते. क्रेडिट लाइन २ अंतर्गत ज्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख आहे त्यांच्यासाठी पुरुषांना ८ टक्के तर महिलांना ५ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज देण्यात येते.

व्यवसायासाठी २० लाख कर्ज बेरोजगारांना व्यवसायासाठी २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी क्रेडिट लाइन १ मधील लाभार्थींना २० लाख कर्ज देण्यात येत ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. क्रेडिट लाइन २ मध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून यातील पुरुषांसाठी ८ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे १० टक्के वार्षिक व्याजदर तर महिलासाठी ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे ८ टक्के वार्षिक व्याजदर आहेत.

बचत गटास २० लाखांचे कर्ज अल्पसंख्याक महिला बचत गटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना राबवली जाते. याअंतर्गत क्रेडिट लाइन १ मधील बचत गटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचत गटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी ९ टक्के वार्षिक व्याजदर आहे, तर क्रेडिट लाइन २ मधील बचत गटातील प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचत गटास ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...