आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुमारे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी पुन्हा सुरू होणार आहे. मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.
मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची विनंती
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून या संदर्भात एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचे आदेश आहे. यासोबतच मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
प्रवास कधी करता येईल
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येईल.
कधी प्रवास करता येणार नाही
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. यासोबतच उपहारगृहे रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची 30 टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.