आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोमवारी अनलाॅकच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रारंभाला मुंबईकरांनी कार्यालयात जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सकाळपासून बेस्ट बससाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी स्वत:च्या वाहनातून कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केल्याने मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
३ जूनपासून राज्यात लाॅकडाऊन हळूहळू हटवण्यात येत आहे. सोमवारपासून खासगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह चालवण्यास संमती दिली आहे. तसेच १५ टक्के कर्मचाऱ्यांसह सरकारी कार्यालये चालू आहेत. आज मोठ्या संख्येने मुंबईकर सकाळीच घराबाहेर पडले. बस क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना मुभा असल्याने अनेकांना बसस्टाॅप ताटकळत राहावे लागले.
बेस्टने ८१ मार्गांवर २५०० बसेस आज सोडल्या होत्या. रांगा लागल्याने फिजिकल डिस्टन्सचा अनेक ठिकाणी फज्जा उडाल्याचे दिसले. मेट्रो, लोकल अद्याप चालू नाही. त्यामुळे अनेकांनी कार्यालय गाठण्यासाठी स्वत:ची वाहने रस्त्यावर उतरवली. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
चर्चगेटला झाली मोठी गर्दी
पश्चिम द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. विलेपार्ले, मुलुंड टोल नाका, वांद्रे येथे वाहनांची गर्दी होती. सकाळपासून अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसत हाेते. मरीन लाइन्स, चर्चगेट येथे आज नेहमीसारखी गर्दी दिसली.
मुंबईतील बहुतांश दुकाने उघडली
शहरात सोमवारी मोठ्या संख्येने दुकाने उघडल्याचे दिसले. दुकानांमध्ये काम करणारे कामगार मुंबईबाहेर राहतात. त्यांची बेस्टला मोठी गर्दी होती. सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी बेस्टने प्रवास करत असल्याने फिजिकल डिस्टन्सला अनेक ठिकाणी हरताळ फासल्याचे दिसून आले. गेल्या ७३ दिवसांनी खासगी कार्यालये व दुकानांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मुबई पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले. मुंबईकर आता लोकल केव्हा सुरू हाेते याच्या प्रतीक्षेत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.