आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनची धास्ती:मुंबईतून राेज 30 हजार मजुरांचे स्थलांतर, लाखो परप्रांतीय मजुरांनी धरली गावची वाट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत तूर्तास रोखली “घरवापसी’

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने परप्रांतीय मजुरांनी टाळेबंदीची धास्ती घेऊन गावची वाट धरली आहे. शहरातून रोज ३० हजारपेक्षा अधिक मजूर गावी परतत असून एमएमआर क्षेत्रातले उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प होण्याची भीती आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ३० लाख परप्रांतीय मजूर आहेत. हातावर पोट असलेल्या या मजुरांना दररोज कामावर जावे लागते. मुंबईतली कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ९ हजारांवर पोहोचली असून टाळेबंदीची भीती या मजुरांमध्ये आहे.

एलटीटी, दादर आणि सीएसएमटी स्टेशनवरून रोज ५० रेल्वे गाड्या उत्तरेत जातात. या तिन्ही स्टेशनवर गेल्या तीन-चार दिवसांपासून मजुरांची गर्दी आहे. एलटीटी स्टेशनातून दैनंदिन २० गाड्या जातात. एलटीटी स्टेशनवर शनिवारी मजुरांची मोठी गर्दी दिसली. सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ६० टक्के प्रवासी क्षमतेत चालवल्या जात आहेत. पहिल्या वर्गाच्या तिकीट घेण्याची अनेकांची तयारी आहे. मात्र तिकीट मिळण्यात अनेक मजुरांना नकारघंटा मिळत आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईत टाळेबंदीची घोषणा होणार आहे, अशी शक्यता अनेक मजुरांनी व्यक्त केली. बरेच परप्रांतीय मजूर होळी, धूलिवंदनला गावी गेले. आठ दिवसांपासून काही परतत आहेत, अशी माहिती धारावीत चामड्याचा कारखाना चालवणारे आलम खान यांनी सांगितले. या मजुरांच्या जाण्याने धारावीतले लघुउद्योग पुन्हा अडचणीत येतील, असे खान म्हणाले. मुंबईला परप्रांतीय मजूर सोडून चालल्याने धडपडत सावरणारे उद्योग, व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीत खायचे कुठे, त्यापेक्षा गावी गेलेले बरे : माझे महिन्याला २५ हजार उत्पन्न होते. मात्र कोरोना आल्यापासून ते निम्म्यावर आले. कोराेनाची दुसरी लाट दोन महिने तरी चालणार. मग, टॅक्सीत कोण बसणार, टाळेबंदीत खायचे कुठे, त्यापेक्षा गावी गेलेले बरे, असे उत्तर प्रदेशाचे त्रिभुवन पांडे म्हणाले. बबलू सिंह हा बिहारमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे. पण, ८ एप्रिलपर्यंतचे गाड्यांचे बुकिंग फुल्ल असल्याने त्याची निराशा झाली.

पुण्यातूनही घरवापसीला सुरूवात : पुणे रेल्वे स्टेशनवरून छत्तीसगडमधील रायपूरला परतत असलेला सुरेश मिश्रा म्हणाला, भोसरीतील कंपनीत मी चार ते पाच वर्षांपासून काम करत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने काय परिणाम होतात याचा अनुभव मागील वर्षी घेतल्याने आता गावी जाणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेला लातूरचा विपीन गवरे म्हणाला,मिनी लॉक डाऊनमुळे हॉटेल, मेस बंद झाल्या आहेत त्यामुळे जेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. क्लास-अभ्यासिका यावर बंधन आल्याने अभ्यास करण्यात अडचणी येत आहे. रूमवर मित्र असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. घरी जाऊन अभ्यास करण्याची मानसिकता बनू लागली आहे

फिर पैदल पिटते पिटते घर कौन जायेगा : किशन यादव
ट्रेन गाडीयाँ बंद हो जायेगी, तो गाव वापस कैसे जाऐंगे. पिछली बार सौ मैल पैदल जाना पडा था. रास्ते में पुलीस ने पिटा. अब इस बार पीटते पीटते घर नहीं जाना है, अशी खंत एलटीटी स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी आलेला गोरखपूरचा किशन यादव याने व्यक्त केली.

औरंगाबादेत तूर्तास रोखली “घरवापसी
गेल्या वर्षी झालेल्या फरपटीचा अनुभव गाठीशी असल्याने यंदा लॉकडाऊन लागण्याआधीच शहरातल्या औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. याची कुणकुण लागताच उद्योजकांच्या संघटना आणि कामगार ठेकेदारांनी त्यांचे समुपदेशन केले. ठामपणे पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला. यामुळे घरवापसीच्या तयारीत असलेल्या कामगारांनी शहरातच राहण्याचे ठरवले. यात दिव्य मराठीच्या बातमीने महत्त्वाची भूमिका बजावली. वाळूज एमआयडीसीत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आदी राज्यांतील लाखभर तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कामगार आहेत. लॉकडाऊन लागले तर नोकरी तर जाईल, शिवाय जेवायचेही हाल होतील. लॉकडाऊन वाढले तर गावी परतणे कठीण होेईल. यामुळे लॉकडाऊनची शक्यता सुरू होताच, त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला होता.

संघटनाकडून समुपदेशन : कामगारांनी बिऱ्हाड गुंडाळून दाटीवाटीने खाजगी वाहनातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. याबाबत दिव्य मराठीने २७ मार्च रोजी “लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगारांनी धरलीत गावची वाट’ हे वृत्त प्रकाशित केले. त्याच दिवशी उद्योजक, उद्योजकांच्या संघटना, कामगार ठेकेदारांनी बैठका घेऊन कामगारांना विश्वासात घेतले. त्यांना काहीही कमी पडू देणार नाही, जेवणापासून निवासाची सोय करू, याची खात्री दिली. मेटलमॅन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मुंदडा, एचआर हेड विजय साळवे यांनीही कामगारांना आश्वस्त केले. यामुळे येथेच राहण्याचे कामगारांनी ठरवले.

लाखभर परप्रांतीय कामगार : गेल्या लॉकडाऊनच्यावेळी मिळेल त्या वाहनाने किंवा पायीही परप्रांतीय कामगार गावी परतले होते. पोलीसांनी २२ हजार परप्रांतीय कामगारांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पोहचवल्याची वाळूज एमआयडीसी ठाण्यात नोंद आहे. पैकी बहुतांश कामगार दिवाळीनंतर परतले. सध्या येथे लाखभर परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज मसिआचे सचिव उद्योजक राहुल मोगले यांनी व्यक्त केला. यापैकी काही नुकतेच गावी परतल्याची खंत त्यांनी वर्तवली.

सोशल मिडीयामुळे संभ्रम : लॉकडाऊन लागण्याआधीच सोशल मिडीया व अन्य माध्यमात याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे सत्यपरिस्थिती कळण्याऐवजी संभ्रम निर्माण होत असल्याचे कामगारांनी सांगीतले.

कामगार स्थिरावले - गेल्या वर्षी आम्ही स्वखर्चाने गावी गेलेल्या कामगारांना वाळूजमध्ये आणले होते. लॉकडाऊनच्या भीतीने ते परत गावी जाण्याच्या तयारीत होते. परंतू आम्ही ५५० कामगारांच्या बैठका घेतल्या. कितीही कडक लॉकडाऊन लागला तरी तुमची गैरसोय होवू देेणार नाही, हे पटवून दिल्याने त्यांनी गावी परतण्याचा निर्णय रद्द केला . - अभिजित जाधव, लेबर काँट्रॅक्टर, साई वैभव एंटरप्रायझेस

बातम्या आणखी आहेत...