आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा...लाॅकडाऊनचे वारे!:समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, सार्वजनिक ठिकाणची गर्दी पाहता कडक निर्बंध घातले जाऊ शकतात : राजेश टोपे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी उसळलेली गर्दी. - Divya Marathi
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी उसळलेली गर्दी.
  • राजस्थान, गोवा, दिल्ली गुजरातच्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक
  • लग्न सोहळ्यातील २०० ची मर्यादा ५० पर्यंत घटवणार

आगामी दोन महिन्यांत कोरोना अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याची शक्यता असून राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी त्याचे संकेत दिले. अर्थात, हे लॉकडाऊन पूर्वीप्रमाणे नसले तरीही लग्न सोहळे, उद्याने, पर्यटनस्थळे, समुद्रकिनाऱ्यासह इतर अनेक गोष्टींबाबत कडक निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या राज्यांतील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत आणावा लागणार आहे.

दिवाळीत खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होती. विनामास्क फिरणारे वाढले आहेत, या सर्वांचाच विचार करून पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले जाऊ शकतात. त्यासंदर्भात दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

उद्यापासून प्रवाशांवर निर्बंध, अधिसूचना जारी

दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढतो आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू आहेत. २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू असल्याचे राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे. चाचणी सकारात्मक आल्यास परत त्यांच्या राज्यात पाठवणी करण्यात येईल, तर लक्षणे दिसल्यास कोविड सेंटरमध्ये दाखल करणार आहे.

विमान प्रवासी : हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत आणणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात येण्यापूर्वी ७२ तास पूर्वी चाचणी व्हावी. विनाचाचणी प्रवाशांची विमानतळावर चाचणी होईल. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागणार आहे. विमानतळावर चाचणी केल्यानंतर प्रवाशांना घरी जाता येईल. कोरोना अहवाल सकारात्मक आल्यावरच प्रवाशाला माहिती कळवली जाईल.

रेल्वे प्रवासी... महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्यांच्याकडे कोरोना नकारात्मक अहवाल असावा. ९६ तास पूर्वी त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करावी. प्रवाशाने चाचणी केली नसेल तर रेल्वेस्थानकांवर त्यांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. कोरोनाची लक्षणे जाणवल्यास अँटिजन चाचणी करण्यात येईल. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास परत त्याच्या राज्यात पाठवले जाईल. कोरोनाची लक्षणे आढळल्यास कोविड सेंटरमध्ये पाठवले जाईल.

रस्ते प्रवासी : रस्तेमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या शारीरिक तपासणीसाठी जिल्हाधिकारी राज्यांच्या सीमेवर व्यवस्था करतील. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येईल. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना महाराष्ट्रात पुढचा प्रवास करता येईल. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवले जाईल.

संख्या पाहून निर्णय : विजय वडेट्टीवार

सध्या पुणे, नागपूर, औरंगाबदेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. पुढील सहा दिवसांत राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

संभाव्य निर्बंध काय असू शकतात ?

लग्न समारंभातील २०० लोकांची मर्यादा ५० पर्यंत घटवणार. समुद्रकिनारे, उद्याने, पर्यटनस्थळांवरील गर्दीला निर्बंध घालणार. मुंबईची लोकल सर्वांसाठी खुली केली जाणार नाही. तसेच रात्रीच्या संचारबंदीचा विचार होऊ शकतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser