आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 4.0:राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढणार, महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; केंद्राला सूचना पाठवणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन वाढवत आर्थिक स्थिती सुधारण्याचे आव्हान

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहून राज्य सरकार लॉकडाऊनची मुदत वाढवून ३१ मेपर्यंत करण्याचा विचार करत आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती बैठकीस उपस्थित सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. तसेच बैठकीत आर्थिक स्थितीबाबतही चर्चा झाली असून वित्त विभाग काही कठोर निर्णय घेणार असल्याचेही समजते.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्हीसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. तसेच, केंद्राने लॉकडाऊन ४.० बाबत नियमावली तयार करून पाठवावी, राज्य सरकार त्यावर अंमल करेल, असेही त्यांनी सांगितले होते. पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढवण्याचे सूतोवाच केल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी विभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लॉकडाऊन वाढल्यानंतर काय करावे लागेल याची माहिती मागवली होती.

तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल मांडण्यापूर्वी चर्चा :

१. कोरोनाशी लढत असतानाच राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न उपमुुख्यमंत्री अजित पवार करीत होते. यासाठी एका तज्ज्ञांच्या समितीची नेमणूक झाली होती.

२. या समितीने अहवाल दिला असून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी यावर चर्चा व्हावी असे त्यांना वाटत होते. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून चर्चा करण्यासाठी बुधवार व गुरुवार अशी दोन दिवस महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात आयोजित करण्यात आली होती.

३. बुधवारी बैठकीत चर्चा झाली नसली तरी गुरुवारी मात्र सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.

लॉकडाऊन वाढवत आर्थिक स्थिती सुधारण्याचे आव्हान

सूत्रांनुसार, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घ्यावयाच्या निर्णयांबाबत चर्चा झाली.

लॉकडाऊन ४.० बाबत चर्चा

राज्यात आणखी किती उद्योग सुरू करता येतील यावर चर्चा झाली. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाईल. झोननुसार कुठल्या गोष्टी सुरू करता येतील यावर चर्चा झाली.

उद्योग विश्व सुरळीत करण्याचा प्रयत्न

लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरू राहावे याची काळजी घेताना काही अटी आणि नियमांसह काही उद्योगधंदे सुरू केले होते तसेच आणखी काही उद्योगधंदे सुरू करता येतील का, यावर चर्चा झाली. याचा एक आराखडा तयार करून तो लवकरच सादर केला जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

केंद्राला सूचना पाठवणार :

१८ मेपूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊन ४.० साठी केंद्राला सूचना पाठवायच्या असून त्या लवकरात लवकर तयार करून शनिवारपर्यंत पाठवल्या जाणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...