आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना उद्रेक:लोकांचा जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय; दोन दिवसांत कठोर निर्बंधांची घोषणा, आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई सत्र न्यायालयाबाहेर चाचणी करण्यासाठी रांगा लावलेले कर्मचारी. - Divya Marathi
मुंबई सत्र न्यायालयाबाहेर चाचणी करण्यासाठी रांगा लावलेले कर्मचारी.

राज्यात तूर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरू आहे. हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे. प्राप्त परिस्थिती पाहता सरकारला तशी तयारी करून ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे स्पष्ट करून काही दिवस नागरिकांना कठोर निर्बंधाची झळ सोसावी लागेल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

राज्यात २ एप्रिलपासून लॉकडाऊन होणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी गुरुवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. राज्यातील नागरिकांनी शारीरिक अंतर आणि मास्क लावण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढणार नाही. परंतु वारंवार आवाहन करूनही लोक नियम पाळत नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनविषयी विचार करणे भाग पडत आहे, असे टोपे म्हणाले.

मुंबईसाठी स्वतंत्र नियम लागू होणार नाही
मुंबईत सध्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुंबईसाठी राज्य सरकार वेगळा निर्णय घेणार का, असा प्रश्न विचारला असता टोपे यांनी स्वतंत्र नियमाची शक्यता नाकारली. या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असली तरी खाटांची कमतरता नाही, लसीकरणही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे ते म्हणाले.

- राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार हे वृत्त फेटाळले, पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. - राज्यातील नागरिक १५ दिवस गर्दीच्या ठिकाणी गेले नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. - अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवू शकते म्हणून लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे,असे टोपे यांनी स्पष्ट केले.

लोकल, मेट्रोची गर्दी कमी करण्यास प्राधान्य
नागरिक घरी राहिल्यास रस्त्यावरची व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होईल, लोकल, बस आणि मेट्रोची गर्दी कमी करण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्यात येऊ शकते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना सरकार ‘वर्क फ्राॅम होम’साठी लवकरच आदेश देणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

वर्क फ्राॅम होमसाठी सरकारचे प्राधान्य
‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकार चाचपणी करत आहे. लॉकडाऊन करावे लागल्यास जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसे काम करता येईल याला सरकारचे प्राधान्य असणार आहे. राज्य सरकार सर्व खासगी कंपन्यांना तसे लवकरच आदेश देण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी १५ दिवस गर्दीत जाणे टाळल्यास साखळी तुटेल : टोपे

राज्यात २४ तासांत ४३,१८३ नवे रुग्ण
मुंबई | महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल ४३,१८३ नवे रुग्ण वाढले. हा काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनचा उच्चांकी आकडा आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २८ लाख ५६,१६३ वर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाख ६६,५३३ वर गेली आहे. गुरुवारी तब्बल २४९ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ५४,८९८ झाली.

विदर्भात ८७ मृत्यू, ७५५६ नवे रुग्ण
अमरावती | विदर्भात गुरुवारी कोरोनामुळे ८७ जणांचा मृत्यू झाला, तर ७५५६ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ६४ जणांमध्ये नागपूरचे ६०,भंडारा १, तर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश आहे. तसेच पश्चिम विदर्भात कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला. यात बुलडाणा ९, यवतमाळ ५, अकोला ५, अमरावती ३, तर वाशीम जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.नागपूर विभागात गुरुवारी ५३२३, तर अमरावती विभागात २२३३ नवे रुग्ण आढळले.

मराठवाडा : ४८३४ पाॅझिटिव्ह, ८९ मृत्यू
मराठवाड्यात गुरुवारी ४८३४ नवे रुग्ण, ८९ मृत्यू झाले. गुरुवारी औरंगाबादेत १४८१ नवे रुग्ण तर ३४ मृत्यूची नोंद करण्यात आली. नांदेडमध्ये ९९५, जालना ४७३, परभणी ४००, हिंगोली १०२, लातूर ७०७, उस्मानाबाद २८३, बीडमध्ये ३९३ रुग्ण आढळले. नांदेडमध्ये २६, परभणी ११, जालना ७, हिंगोली-उस्मानाबाद प्रत्येकी ४, बीड २, लातूरमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...