आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलाॅक 2:पुनश्च लॉकडाऊन! केंद्र व राज्याची नवी नियमावली जारी, शाळा-कॉलेज 31 जुलैपर्यंत बंद, पार्लर, सलून चालू ठेवता येतील

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरराज्य प्रवासाची मुभा; एसटी, माॅल, हाॅटेल, थिएटर, रेल्वे, बस बंदच राहणार

मुंबईसह राज्यात पुन्हा लाॅकडाऊन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. ‘पुनश्च हरिओम’ म्हणून राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिल्या टप्प्यांतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु त्यानंतर राज्यभरात झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे ‘पुनश्च हरिओम’ ऐवजी ‘पुनश्च लॉकडाऊन’ वाढवण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.

पूर्वीप्रमाणे एसटी, माॅल, हाॅटेल, थिएटर बंदच राहणार आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. रात्री केंद्र सरकारनेही नवी नियमावली जारी केली. त्यानुसार शाळा,महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.

केंद्र सरकारकडूनही नवी नियमावली जारी

केंद्र सरकारच्या अनलॉक २.० नव्या नियमावलीनुसार शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी अथवा पासची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून काम सुरू करू शकतील.

लॉकडाऊन उत्तर नाहीच, आरोग्य सुविधा वाढवा

ग्रामीण भागात सामूहिक नेतृत्वामुळे संसर्ग आटोक्यात आहे. शहरात ते शक्य नाही. परिणामी सध्या तरी लाॅकडाऊनला पर्याय नाही हे मानले तरीही लाॅकडाऊनमुळे लोक त्रस्त आहेत. आर्थिक फटका बसतो आहे. पण त्याला नागरिकच जबाबदार आहेत. नियम न पाळणाऱ्या बेफिकीर नागरिकांमुळे प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेऊन लक्ष ठेवावे. यावर लाॅकडाऊन उत्तर नाहीच, आरोग्य सुविधा वाढवायला हव्यात. प्रा. डाॅ. नीरज हातेकर, अर्थतज्ञ व कोरोना साथीचे अभ्यासक, मुंबई विद्यापीठ.

पार्लर, सलून चालू ठेवता येतील

दुचाकीवर पूर्वीप्रमाणे चालवणारा एकटाच जाऊ शकणार आहे. रिक्षा, टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती प्रवास करू शकतील. बस आणि एसटीमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवेश असणार आहे. वृत्तपत्र घरोघरी टाकण्यास संमती आहे. पार्लर आणि सलून चालू ठेवता येतील. हाॅटेल्समधून होम डिलिव्हरीस तसेच बांधकामे चालू ठेवण्यास संमती आहे.

औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे, अकोल्यात अधिक सावधगिरी

कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात मिशन बिगिन अगेन पहिल्या टप्प्यांतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. परंतु निर्बंध असणार आहेत.