आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:रुग्ण वाढतच राहिल्यास काही शहरांत लॉकडाऊन शक्य : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या रुग्ण संख्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर काही शहरात लॉकडाऊन लावावा लागेल. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. पण जनतेला एकच आवाहन करतो की, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थिती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल बोलणे झाले आहे. काही शहरात लॉकडाउन लावावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांचं म्हणणे आहे. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल.

सरकारने लसीकरणावर विशेष लक्ष दिले आहे, असे सांगत टाेपे म्हणाले की, आम्ही खासगी लसीकरणाची ठिकाणे वाढवतो आहे. ग्रामीण भागातही उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी व्यवस्था केली जात आहे. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंतदेखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे.

लसीकरणासाठी १.७७ कोटी लाेक पात्र; २.२० कोटी डोसची गरज
टोपे यांनी राज्यात लस वाया जात असल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले, केंद्राने म्हटले हाेते की महाराष्ट्राला लसीचे ५८ लाख डोस पुरवण्यात आले असून त्यापैकी हजारो डोस वापरलेले नाहीत. मात्र राज्यात अशी परिस्थिती नाही. सध्याच्या टप्प्यात राज्यात लसीकरणासाठी १.७७ कोटी नागरिक पात्र आहेत. त्यासाठी २.२० कोटी डोसची गरज आहे.

हाफकिनमध्ये राज्य सरकार १७ लाख डोस तयार करू शकते
हाफकिनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी. तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्णवाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८०% असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे. कोविशील्डच्या २ डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

तीन महिन्यांत लसीकरण
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, दररोज राज्यात ३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. इथून पुढे आणखी जे जे लोक लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ. आम्हाला मोठ्या प्रमाणावर लसीकरण करायचे आहे. तीन महिन्यांत लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...