आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ:मंत्री लोढांनी चुकीची माहिती दिली, आव्हाडांचा आरोप; शेलार म्हणाले - कायदाच आणा

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह जिहादवरून विधानसभेत शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. या प्रकरणी लोढांनी माफी मागावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. तर आशिष शेलार यांनी लव्ह जिहादवर चर्चा करा. यावर कायदा आणा, अशी मागणी केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंगलप्रभात लोढा यांनी काल चर्चा करताना एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला. एक लाख लव्ह जिहादची प्रकरणे घडल्याचे ते म्हणाले. मात्र, माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यानुसार ३४९३ इंटरफेथ प्रकरणे घडली. ते त्याला लव्ह जिहाद म्हणतात. एका मंत्र्याने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

आमदार योगेश सागर यांनी आव्हाडांच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, लव्ह जिहाद प्रकरणाचा संबंध सभागृहातील कुठल्याही सदस्याशी नाही. त्यांनी कुठल्याही धर्माचा उल्लेख केला नाही. कुठल्या संप्रदायाचा उल्लेख केला नाही. एखादा विषय आला, की आपल्याला त्या समाजाचा काय पुळका उभा येतो, हे वारंवार जर या सभागृहास निदर्शनास आणून देणार असतील, तर तो संदर्भ सव्वालाख असेल की, तीन हजार असेल. त्याचा काय संबंध. त्यांनी पहिले ते सांगावे. हे बाजू कुणाची घेत आहेत. कोणाची वकिली कोणाची करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

आशिष शेलार म्हणाले, मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आकड्यातून समाजामध्ये काही वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. या पद्धतीने त्यांना मंत्र्यांवर हेतू आरोप करायचा असेल, तर त्यांना नोटीस दिली पाहिजे. लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये चर्चा करायची असेल, तर करू ना आव्हाड साहेब. आम्ही घाबरत नाही. हिंदू मुलींवर अन्याय, अत्याचार करणारा लव्ह जिहाद आहे. लव्ह जिहादवर कायदा आलाच, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर वादविवाद नको. कामकाज सुरू करू म्हणत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. त्यानंत आमदार अबू आझमी उभे राहिली. त्यांनीही मंगलप्रभात लोढा यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. लव्हा जिहाद नाहीच, असा दावा केला. त्यामुळे गोंधळ वाढला.

मंत्री गुलाबराव पाटील बोलायला उभे राहिले. त्यांनी लव्ह जिहादचे प्रकरण पाहिजे असतील, तर माझ्याबरोबर चला. माझ्या गावात दोन प्रकरणे घडली आहेत. तुम्ही मुंब्रा येथे राहता म्हणून बोलू नका. त्यांची मते पाहिजे म्हणून बोलू नका. ज्याची मुलगी जाते. त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. दुबईला जाऊन मुली विकल्या जात आहेत. तुम्हाला माहिती नाही. तुम्ही मतांचे लांगुलचालन करता, असा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...