आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामानाचा अंदाज:अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; अवकाळी, गारपिटीचेही सावट, बीड, जालना, सोलापूर, अकोला जिल्ह्यांना यलो अलर्ट

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुलाबा वेधशाळेने राज्यातील १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे राज्यावर या आठवड्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचे सावट आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान असून राज्यात अनेक जिल्ह्यांत हलक्या पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अहवालानुसार, सध्या अरबी समुद्रात कर्नाटक ते महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर कमी दाब आहे. वायव्य अरबी समुद्र तसेच गुजरात ते पंजाबपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. सौराष्ट्र व कच्छ भागात चक्रीवादळास अनुकूल स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातही आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. परिणामी राज्यात ६ ते ९ जानेवारीदरम्यान अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

हा आठवडा पावसाचा
पुणे वेधशाळेनेही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
६ जानेवारी - दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
७ जानेवारी : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
८ जानेवारी : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

१८ जिल्ह्यांना यलो अलर्ट
कुलाबा वेधशाळेने राज्यातील १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत सहा ते आठ जानेवारी या काळात विजांच्या कडकडाटासह २.५ ते ६४.४ मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. यलो अलर्ट जारी केलेले जिल्हे असे : उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser