आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक:मॅग्नेटिक महाराष्ट्र : 61 हजार कोटी रुपयांचे करार, अडीच लाख रोजगार, समतोल विकास साधण्यावर भर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार प्रक्रिया पार पडली. - Divya Marathi
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार प्रक्रिया पार पडली.
  • महाराष्ट्राची मॅग्नेटिक पाॅवर कुणी हिरावून घेऊ शकत नाही : मुख्यमंत्री

कोरोनाचे मळभ झटकून राज्य सरकारने देशातील आघाडीच्या कंपन्यांसोबत बुधवारी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. त्यातून अडीच लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात सुपर मॅग्नेटिक पाॅवर असून ती कुणी हिरावून घेऊ शकणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे मंगळवारी २५ भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यांतच एक लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात वर्षभरात २ लाख कोटी तर कोरोनाकाळात १.१२ लाख कोटींची गुंतवणूक

उद्योजकांना बाहेर जाण्याची गरज नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. उद्योजक हे महाराष्ट्राच्या परिवारातील सदस्य आहेत. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. राज्य आणि देशाप्रतिची निष्ठा महत्त्वाची. मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी काम करतो ही भावनाच खूप मोलाची आहे.

- कोविडचे संकट टळलेले नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असली तरी युरोपात स्ट्रेन वेगाने पसरतोय. या गुंतवणुकीत पिझ्झा, आइस्क्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे.

- उद्योग मित्र संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील. उद्योजकांनी संकटाच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार कायम आपल्यासोबत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योजकांना दिली. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी : उद्योग विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, ६ महिन्यांत १.१२ लाख कोटींची गुंतवणूक झाली. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध झाली. रायगड जिल्ह्यात देशांतील त्यामध्ये सर्वात मोठा स्टील कारखाना सुरू करण्याचा मानस या वेळी उद्योजक सज्जन जिंदाल यांनी बोलून दाखवला.

समतोल विकास साधण्यावर भर
राज्यात उद्योगांचा समतोल विकास साधण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी या वेळी दिली. दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली आहे.

उद्याेगांना फक्त २१ दिवसांत परवाना
एमआयडीसीचे सीईओ डॉ.पी. अन्बलगन म्हणाले, जून, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सामंजस्य करार झाले. महापरवानामुळे २१ दिवसांत परवाना मिळतोय. उद्योग सुरू करण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. महाजॉब्जमुळे उद्योग व नोकरी मागणाऱ्यांमध्ये दुवा म्हणून काम शासन काम करत आहे.

प्रमुख गुंतवणूकदार, त्यांची गंुतवणूक आणि प्रस्तावित रोजगार
{ जेएसडब्ल्यू स्टील (२० हजार कोटी रुपये गुंतवणूक- ३ हजार रोजगार) {इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टिक : ११०४९.५ कोटी - ७५ हजार रोजगार { के. रहेजा : ७५०० कोटी - ७० हजार { बजाज ऑटो : ६५० कोटी - २५०० { कीर्तिकुमार स्टील : ७५०० कोटी - ६० हजार { इन्स्पायर इन्फ्रा (औरंगाबाद) लि. : ७५०० कोटी - १० हजार { एक्साइड इंडस्ट्रीज : ५०० कोटी- १ हजार {गोयल गंगा : १ हजार कोटी-१० हजार.

आयटी, स्टील, लाॅजिस्टिकसह २५ बड्या कंपन्यांचा समावेश
यापूर्वी २९ करार, त्यापैकी २१ उद्योगांना जमीन वाटप

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत उद्योग करारांचा हा तिसरा टप्पा आहे. करार होत असलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. यापूर्वी २९ करार झाले आहेत. त्यापैकी २१ उद्योगांना जमिनी देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...