आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कडक:आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवत नाही तर पाेट भरणाऱ्या थाळ्या देतो, राज्यपालांच्या आभारप्रदर्शनाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचे घणाघाती उत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी आंदोलन, कोरोना, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसह मोदी सरकारवर जोरदार हल्ला

काेराेना काळात केंद्र सरकारने जनतेसाठी एकीकडे माेफत धान्य दिले अन् दुसरीकडे गॅस, इंधन दरवाढ केली. त्यामुळे मोफत धान्य शिजवायचे कसे, असा प्रश्न हाेता. दुसरीकडे रिकाम्या थाळ्या वाजवायला लावल्या, पण आम्ही जनतेला शिवभाेजन याेजनेतून भरलेल्या थाळ्या दिल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावावर बोलताना मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचारासह विविध मुद्द्यांवर ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रस्तावाला उत्तर देताना ठाकरे यांनी जोरदार सविस्तर उत्तर देताना संत तुकाराम, ज्ञानपीठ विजेत्या विंदा करंदीकर यांच्या कवितांचाही वापर केला.

जाे झूठ बाेलते हैं, उनकी बेईमानी खतम कराे....
विराेधकांनी ‘ऐ मेरे वतन के लाेगो, जाे सत्ता में आए, याद कराे उनकी बेईमानी’ या गाण्याचा वापर करून ठाकरे सरकारला सुनावले हाेते, त्या गाण्याचा वापर करीत ठाकरे यांनी ‘ए मेरे वतन के लाेगाे, जाे झूठ बाेलते है, उनकी बेईमानी खतम कराे’ असे प्रत्युत्तर दिले. हे म्हणतानाच यमक नाही पण काम करण्याची धमक आमच्यात आहे, असे ठणकावून सांगितले.

सत्ताधारी-विरोधी पक्ष कोरोना ओळखत नाही : मी जबाबदार मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला उद्देशून ते म्हणाले, ‘मी जबाबदार’ ही मोहीम हे उघडा ते उघडा त्यांच्यासाठी आहे. मला वाईट म्हटलं तरी चालेल. मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, जनतेच्या जिवाशी खेळ करू नका. पण एका वर्गासाठी समाज धोक्यात घातला तर तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही.

ते ठाकरेंचे हिंदुत्व, येरागबाळ्याचे नव्हे : बाबरी पाडणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे, अशी टीका फडणवीसांनी केली होती. पण बाबरी मशीद पाडली तेव्हा येरेगबाळे पळून गेले हाेते, असा टोला लगावून तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले, हाेय, आम्हीच मशीद पाडली, हे बाळासाहेबांचे हिंदुत्व लक्षात ठेवा, ते येरागबाळ्यांचे हिंदुत्व नाही, अशा कडक शब्दांत भाजप, संघावर हल्ला चढवला.

आता राम मंदिरासाठी घराेघर जाऊन पैसे मागताहेत, हेच हिंदुत्ववादी काश्मिरात फुटीरतावादी म्हणणाऱ्यांसाेबत, संघमुक्त भारत करताे म्हणणाऱ्या नितीशकुमार, पासवान यांच्यासाेबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसले. त्यांची आम्हाला हिंदुत्व शिकवण्याइतकी पात्रता नाही, असेही ठाकरे म्हणाले.

चीन समोर आला की पळे हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भारतीय सैनिकांचा अपमान आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. राम मंदिरासाठी भाजप पैसे मागतोय या मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर फडणवीसांनी खोचक टिप्पणी केली. बाबरी मशीद पाडण्यासाठी हे कुणीच नव्हते, आम्ही होतो. जनता पैसे देते, समर्पण देतेय, ज्यांना खंडणी वसुलीची सवय, त्यांना जनतेच्या समर्पणाची सुई टोचतेच, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

अमित शहांच्या मुद्द्यावर विराेधकांचा सभात्याग
मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून अमित शहा यांच्याबाबतचा उल्लेख कामकाजातून वगळावा, अशी मागणी केली. त्यावर शिवसेना आमदारांनी हरकत घेतली. या गोंधळात आवाजी बहुमताने अभिभाषणावरील आभारप्रदर्शनाचा ठराव मंजूर झाला. त्या वेळी विरोधकांनी सभात्याग केला.

शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे
वीज प्रश्नावर बोलताना केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपला दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांवर कसा अन्याय चाललाय, याची आठवण करून दिली. शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, अशा खोचक शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

बाळासाहेबांच्या खोलीतील बोलणी निर्लज्जपणे नाकारली
निवडणुकीच्या अगाेदर बाळासाहेब ठाकरे ज्या खाेलीत राहत हाेते, त्या खाेलीत अमित शहा यांनी माझ्यासाेबत बसून पुढील आखणी केली हाेती. त्या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना बाहेर थांबवले हाेते. ते का थांबवले माहिती नाही. पण आत ठरलेल्या गोष्टी बाहेर आल्यानंतर ‘निर्लज्जपणाने’ बोलणी नाकारली गेली, असा हल्ला गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चढवला.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करणारच !
औरंगाबादच्या नामकरण मुद्द्यावर फडणवीसांनी टीका केली होती. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. सरदार वल्लभभाई स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, अशी मिश्किल टिप्पणी करून आैरंगाबादचे संभाजीनगर जरूर करू, पण त्याअगाेदर औरंगाबाद विमानतळाला छत्रपतींचे (संभाजीराजे) नाव द्यायला माेदी सरकारला काेणी अडवलेय, असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारला.

पीएम फंडाचा हिशेब कोण देणार?... महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही वा मृत्यूही नाही. कोरोनाच्या प्रश्नावर असे उत्तर त्यांनी विरोधकांना दिले. कोविड काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाचं आवाहन केलं आणि हिशेब आमच्याकडे मागताय? दिल्लीच्या पीएम केअर फंडाचा हिशेब कोण देणार, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांची टीका
मुख्यमंत्र्यांचे एेतिहासिक ‘सुमार’ भाषण, सैनिकांचाही अपमान
विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर आल्यावर जोरदार टीका केली. इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचे भाषण एवढे सुमार झाले. त्यांना चौकातले भाषण आणि सभागृहातील भाषण यातील अंतर अजून समजलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंंच्या भाषणाची खिल्ली उडवली. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलावं लागतं. राज्यातील प्रश्नावर बोलावं लागतं. दुर्दैवाने शेतकऱ्यांबाबत ते एक मुद्दाही बोलले नाहीत. बोंडअळी, खोडकिडी, वीजतोडणीबद्दल बोलले नाहीत, साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज तोडली, त्यांची काळजी नाही, असे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...