आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांत थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचे यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे. गतवर्षापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकाने महाराष्ट्रासह गुजरातला मागे टाकून सर्वाधिक विदेशी गुंतवणूक पटकावली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील उद्योग प्रकल्पांची संख्या महाराष्ट्रातील उद्योगांपेक्षा एक तृतीयांश आहे, मात्र त्यातील झालेली गुंतवणूक महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.
सन २०१७-१८, २०१८-१९ पर्यंत विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रातील विदेशी गुंतवणुकीच आलेख अन्य राज्यांच्या तुलनेत खाली येताना दिसत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार सन २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर लोटून गुजरात देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीचे राज्य ठरले होते. २०२१-२२ मध्ये कर्नाटकाने पहिल्या क्रमांकवर मुसंडी मारून गुजरात आणि महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
काळानुसार कर्नाटकने बदलला पॅटर्न
सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही खरं तर महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब होती. मात्र, सध्या राज्यात महागडी वीज, जागेची टंचाई व प्रदूषण, पर्यावरण खात्यांच्या वेळखाऊ परवानग्या आदी अडथळे आहेत. कर्नाटकसारख्या राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेत जमिनीची उपलब्धता, विजेचा प्रतियुनिट दर व अन्य परवानग्यांचा वेग कमी असल्याने तेथील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसते. महाराष्ट्रातील या अडचणींवर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आम्ही उद्योगमंत्र्यांना केली आहे, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
या ३ कारणांमुळे महाराष्ट्रापेक्षा ठरले कर्नाटक वरचढ...
- कर्नाटकात वीज 7.50 रु. प्रतियुनिट, महाराष्ट्रात 10.50 रु.
- महाराष्ट्रात परवान्याला 3 महिने प्रतीक्षा, कर्नाटकात 7 दिवसांत
- कर्नाटकात जागेची ऑफर, महाराष्ट्रात करावी लागते वणवण
प्रकल्प संख्या
महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्पांची संख्या २१,२१६ च्या घरात असून त्यातील परकीय गुंतवणूक १५,०९,८११ कोटी रुपये आहे. तुलनेत कर्नाटकातील प्रकल्पांची संख्या फक्त ६,१५९ असली तरी त्यात १५,६७,२७७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
गेल्या ५ पैकी तीन वर्षांपर्यंत महाराष्ट्र पहिल्या स्थानी होता
राज्यनिहाय विदेेशी गुंतवणूक (कोटी रुपयांमध्ये)
2017-18
महाराष्ट्र - 86,244
कर्नाटक - 55,334
तामिळनाडू - 22,354
गुजरात - 13,457
आंध्र प्रदेश- 8,037
2018-19 महाराष्ट्र - 80,013 कर्नाटक - 46,963 तेलंगण - 23,882 तामिळनाडू - 18,164 गुजरात - 12,618
2019-20 महाराष्ट्र - 77,389 कर्नाटक - 63,177 गुजरात - 42,976 तामिळनाडू - 16,624 तेलंगण - 8,447
2020-21 गुजरात - 1,62,830 महाराष्ट्र - 1,19,734 कर्नाटक - 56,884 तामिळनाडू - 17,208 तेलंगण - 8,618
2021-22 कर्नाटक - 1,02,866 महाराष्ट्र - 48,633 गुजरात - 11,145 तामिळनाडू - 8,364 तेलंगण - 7,506
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.