आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मत:महाराष्ट्र, बंगाल व पंजाबकडे आजही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता : शरद पवार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या जडणघडणीत आजवर महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तिन्ही राज्यांकडे आजही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

सरहद संस्थेने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्वा’चे औपचारिक उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा, डॉ. अमोल देवळेकर, संयोजक युवराज शहा, विकास सोनताटे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी निमित्त १ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या पर्वा अंतर्गत १ ऑगस्टपासून महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य, कला, संस्कृती आणि समाजकारणाच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देण्यात येणार आहे.

पवार म्हणाले, ‘लाल-बाल-पाल या तिघांचे देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान आहे. काँग्रेसची स्थापना होण्याच्या वेळी देशात प्लेगची साथ आली होती. त्यामुळं पुण्याला होणारे अधिवेशन मुंबईला घ्यावं लागलं होतं. तशीच परिस्थिती आजही आहे. पुण्याला होऊ घातलेला हा कार्यक्रम आज मुंबईत होतो आहे. ‘अलीकडच्या काळात रवींद्र संगीत किंवा बंगाली साहित्य हे महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण वाढले आहे. या पर्वामुळे या देवाण-घेवाणीला एक निश्चित दिशा मिळेल. या उपक्रमांतर्गत ५० पेक्षा जास्त अधिक पुस्तकांचे भाषांतर होणार आहे. साहित्यासह संगीत असेल, किंवा अन्य कला क्षेत्रांमध्येही आदान-प्रदान घडवून आणण्याचे काम केलं जाणार असल्याचं डॉ. देवळेकर यांनी सांगितलं. ‘यंदा १ ऑगस्टपासून लोकमान्य टिळकांचे स्मृति शताब्दी वर्षं सुरू होते आहे. २०२१ हे सत्यजित रे यांचे शताब्दी वर्ष आहे, तर २०२२ ही योगी अरविंदांच्या जयंतीचे १५० वे वर्ष आहे. त्यामुळेच १ ऑगस्ट २०२० ते १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत या ‘महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्व’ साजरं केलं जाणार असल्याची माहिती नवलाखा यांनी दिली.

साहित्य क्षेत्रात बंगालला समृद्ध वारसा

रवींद्रनाथांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी होते. त्यांनी संत तुकारामांचे अभंग बंगाली भाषेत नेले. तसंच गीतारहस्यही बंगालीत नेलं. सुभाषबाबूंचे तर प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांवरही रवींद्रनाथांचा खूप प्रभाव होता. या देवाणघेवाणीच्या ऐतिहासिक पर्वाला या निमित्ताने उजाळा मिळणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रानंही या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे, असेही पवार यांनी सांगितले.