आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गजांवर खप्पामर्जी:भाजप कार्यकारिणीत दिग्गजांना नाही स्थान, आयारामांना मात्र मानाचे पान! फडणवीस विरोधकांना बाहेरचा रस्ता 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप कार्यकारिणीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचाच वरचष्मा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचाच वरचष्मा कायम आहे. त्याचे कथित पक्षांतर्गत विरोधक एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे या मातब्बर नेत्यांना डावलण्यात आले आहे. भाजपत आलेल्या आयारामांना मात्र मानाचे स्थान देण्यात आले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांत १२ प्रदेश उपाध्यक्ष, ६ प्रदेश सरचिटणीस, १२ चिटणीस आहेत. त्याशिवाय ७ मोर्चा अध्यक्ष आणि १८ प्रकोष्ठांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र व सामाजिक विभाग लक्षात घेऊन सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून ३३% महिला प्रतिनिधींचा समावेश असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

विशेष निमंत्रितांच्या यादीत नावापुरता केला समावेश

विशेष निमंत्रितांच्या यादीत ५८ नेत्यांना स्थान दिले आहे. त्यात तावडे, खडसे, मुंडे, मेहता नावालाच आहेत. पण, बाहेरून आलेले नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भाेसले, हर्षवर्धन पाटील, विजयकुमार गावित, मधुकर पिचड, राम ठाकूर, गोपाळदास अग्रवाल, रामराव वडकुतेंना स्थान दिलेले आहे.

कार्यकारिणीत आयारामांची अनेक पदांवर वर्णी

भाजपच्या १२ नव्या उपाध्यक्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले प्रसाद लाड, कपिल पाटील, चित्रा वाघ आणि भारती पवार यांना चक्क उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. कार्यकारिणीच्या निमंत्रित यादीत ७९ सदस्य आहेत. त्यामध्ये आयारामांना अधिक स्थान आहे. त्यात कोल्हापूरचे धनंजय महाडिक, नगरचे वैभव पिचड, पालघरचे राजेंद्र गावित, सिंधुदुर्गचे नीलेश राणे, नवी मुंबईचे संजीव नाईक, सोलापूरचे लक्ष्मण ढोबळे, साताराचे मदन भोसले अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माजी नेत्यांचा समावेश आहे.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनाही डच्चू

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी शिक्षणमंत्री विनाेद तावडे, माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा उपाध्यक्षांच्या यादीत समावेश अपेक्षित होता. हे सर्व फडणवीस विरोधक समजले जातात. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट झाल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...