आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबजेट 2021:राष्ट्रवादीला सर्वाधिक, शिवसेनेचे भागले, काँग्रेसच्या पदरात कमीच; अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

साेमवारी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्या त्या पक्षाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खातेनिहाय मिळालेल्या रकमांचा हिशेब केल्यानंतर अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या खात्यांसाठी पैसा मिळाला आहे. त्या तुलनेत काँग्रेसच्या पदरात कमी दान मिळाले आहे. काही माेठ्या याेजना आणि विशेष या‌ेजनांचा लाभ तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना हाेणार आहे. ते वगळता मिळालेले बजेट पाहता साधारण टक्केवारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट वर्चस्व दिसते.

प्रत्येक पक्षाने गड राखले
राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी पुण्यासाठी, छगन भुजबळांनी नाशिकसाठी, काँग्रेसच्या अशाेक चव्हाणांनी नांदेडसाठी तर शिवसेनेने मुंबई, आैरंगाबाद, काेकण आदी भागातील आपल्या वर्चस्वासाठी पुरेपूर निधीची तरतूद करून घेतल्याचे दिसते आहे. येत्या काही महिन्यांत मुंबई, पुणे, नाशिक, आैरंगाबाद, साेलापूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शहरी याेजनांबराेबर कृषी याेजनांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मंत्र्यांनी भर दिल्याचे स्पष्ट हाेत आहे.

शेतकऱ्यांसाठी : तीन लाखांच्या कर्जावर शून्य टक्के व्याज
तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या व ते वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०२१ च्या खरीप हंगामापासून शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार. थकीत वीज बिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सवलत देण्यात आली आहे.

ऊसतोड कामगार : निधीसाठी सरकारची ठोस तरतूद
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी उपलब्ध व्हावा यासाठी साखर कारखान्यांकडून गाळपानुसार प्रतिटन उसामागे १० रुपये आकारून प्राप्त होणाऱ्या रकमेत राज्य सरकार तेवढीच रक्कम अनुदान देणार.

युवकांसाठी : विद्यावेतनापोटी सरकार ५ हजार रुपये देणार
राज्यातील शिकाऊ उमेदवारांना त्यांना देय विद्यावेतनाच्या ७.५ टक्के किंवा ५००० रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम सरकार देणार. एक मे २०२१ पासून योजना सुरू होईल. यंदा दोन लाख युवा उमेदवारांना योजनेत सहभागी करून घेतले जाईल.

कामगारांसाठी : संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना
असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी, घरकाम करणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना जाहीर. यासाठी २५० कोटींची तरतूद. या निधीतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवणार.

बातम्या आणखी आहेत...