आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजेटमध्ये मिळाला भोपळा... महाराष्ट्राला मिळाला भोपळा... बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा...बजेट म्हणजे रिकामा खोका... सर्वसामान्यांना मिळाला भोपळा... सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्यांवर आंदोलन केले. जाणून घेऊ विधिमंडळातील ठळक घडामोडी...
अधिवेशनातील ठळक घडामोडी
- मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागात मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता मुख्यमंत्री यांना केवळ अवगत केले, असा शेरा लिहून तब्बल ५०० कोटी रुपयांच्या जाहिरात घोटाळ्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात २८९ अनव्येच्या प्रस्तावाद्वारे केली.
- २०१४ ते २०१९ काळात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या विभागांना ५०० कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या गेल्या आहेत. एवढा मोठा सरकारी निधी मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता केवळ तोंडी स्वरूपात मान्य करून डीजीआयपीआरच्या माध्यमातून दिला गेला. या जाहिराती एका अर्थाने अनियमितता आहे. यात सध्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपदी कार्यरत पोलिस महासंचालक व तत्कालीन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्यावर ठपका सुद्धा ठेवण्यात आला आहे. ५०० कोटी रुपयांच्या जाहिराती या एका अर्थाने मोठा घोटाळा आहे. सरकार यावर पांघरून घालणार की, यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असा सवाल अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला.
- बीड जिल्ह्यातील सौंदाणा येथील 27 वर्षीय विवाहित महिलेवर पुण्यात अघोरी अत्याच्यार करण्यात आले असून 2022 मध्ये घडलेल्या या प्रकारबद्दल पती, सासू-सासऱ्यासह 7 जणांवर 7 मार्च 2023 रोजी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गंभीर घटनेवर आज विधान परिषद सभागृहात आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे लक्ष वेधून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. अंधश्रद्धा वाढवणाऱ्या अशा लोकांवर वेळोवेळी शोध मोहीम राबवून जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 नुसार करावाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
- खते घेणाऱ्या शेतकऱ्याला जात विचारू नये, असे विनंतीवजा पत्र अखेर राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना पाठवले आहे. सांगली येथे रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशीनवर जात सांगावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप होता. विधानसभेतही हा मुद्दा गाजला. खते विकत घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने एक अॅप तयार केले आहे. त्यात हा प्रकार समोर आला होता. - मागचे अडीच वर्ष फेसबुकवर सरकार चालले. मुख्यमंत्र्यांना साधे एक निवेदन देता आले नाही. शेतकऱ्यांची लाइट महाविकास आघाडी सरकारने तोडली. त्यांना शेतकऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना उद्धव ठाकरे सरकारने बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेताला जाणारे पाणी तोडले, असा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला.
- वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यावर ओव्हर ड्राफ्ट घेण्याची परिस्थिती ओढावली होती. या सर्व परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्राने नवीन पेन्शन योजनेत जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण जगात कुठल्याही अर्थव्यवस्थेत हीच पेन्शन योजना सुरू आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू केली, तर 2030 नंतर राज्यावर बोजा वाढेल, अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केली...वाचा सविस्तर...
- लव्ह जिहादवरून विधानसभेत शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. या प्रकरणी लोढांनी माफी मागावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. तर आशिष शेलार यांनी लव्ह जिहादवर चर्चा करा. यावर कायदा आणा, अशी मागणी केली...वाचा सविस्तर...
- पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील महाजन आश्रम शाळेला आवश्यक ती सर्वोतोपरी मदत पुरविण्यात येणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सरकारकडून देण्यात आली. २१ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या आश्रमशाळेला भेट दिली होती. त्यावेळी शाळेतील दोन ट्रस्टमध्ये भांडण असल्याचे समोर आले. असे असतानाही तेथील एक मुख्याध्यापक जे ट्रस्टी आहेत त्यांनी चांगलं काम या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी केल आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेतील ट्रस्टींचे भांडण मिटवून त्यावर तोडगा काढण्याची व शाळेला सहकार्य करण्याची मागणी आज परिषद सभागृहात दानवे यांनी केली.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन आम्ही केंद्राला कळवणार आहोत. काल ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला आहे त्यामुळे विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यांची परिस्थिती समजून घ्या असे मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.
- विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सांगली जिल्ह्यात जर शेतकऱ्यांना खत घ्यायचे असेल तर त्यांना पहिले जात सांगावी लागत आहे. शेतकऱ्यांना जात नसते - शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. जातीचा रकाना भरल्याशिवाय फाॅर्म भरला जात नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नाही. यावरती संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांना जात नसते, पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नाही...वाचा सविस्तर...
- केंद्र शासनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका घेतली असल्याची टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांन केली. त्यांनी प्रवर्गाची तरतूद केली आहे. मागच्या दाराने लोकांचा डेटा गोळा करणे सूरू आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा डेटा निवडणुकीत वापरण्यासाठी असा प्रकार तर सूरू नाही ना अशी शंका मनात येत आहे.
- पंचामृत ध्येयावर आधारित एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांना अर्ध्या तिकिटांत एसटीचा प्रवास आणि राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार अशा घोषणांची आतिषबाजी केली. महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. हे पाहता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा षटकार ठोकला आहे.
- शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकलपवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरले..फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा', अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर वास्तवाचा भान नसलेला अर्थसंकल्प असून हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.
- राज्यातील कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण उत्पादक शेतकरी संकटात आहे. 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे वाया गेली आहेत. त्यांनातत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.