आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ अधिवेशन:महागाई रोखण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना का नाही; अजित पवारांचा विधानसभेत सवाल

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला.

LIVE

- शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह मार्फ केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणाच्या तपासासाठी 'एसआयटी'ची स्थापना केल्याची घोषणा सोमवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे याने हा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवर अपलोड केला असून, इतर आरोपींनी जाणीवपूर्व काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल करून फेसबुक पेजवर शेअर केल्याचे समोर आल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडली आहे...वाचा सविस्तर...

- राजकोषीय विवरण पात्रात तुम्ही महागाई वाढल्याचे मान्य केले आहे. मात्र, महागाई रोखण्यासाठी अर्थसंकल्पात काहीही उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. फाइल कशाला तुंबवून ठेवत आहात. जवळपास तीन हजार फाइल मंत्रालयात निर्णयाविना पडल्यात. त्यावर काही तरी निर्णय घ्यावा, अशी मागणीही पवारांनी केली.

- जुन्या पेन्शनबाबत कर्मचारी संघटना आणि शिंदे-फडणवीसांमध्ये झालेली बैठक संपली असून, यावेळी सकारात्मक चर्चा झाली. जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक असल्याचे समजते. मात्र, कर्मचारी संघटनेसोबत पुन्हा एक बैठक होणार आहे. तसेच याबाबत तातडीने निर्णय न घेता, एक समिती नेमण्यात येणार आहे.

- परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे नाव गॅझेटमध्ये आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केला. त्यावर परळी वैजनाथचे महत्त्व कोणीही कमी करू शकणार नाही. मात्र, यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

- जुन्या पेन्शनवर कर्मचार संघटना-मुख्यमंत्र्यांमध्ये विधानभवनात बैठक सुरू. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याची उत्सुकता आहे.

- समृद्धी महामार्गावर शेगावच्या अलीकडे झालेल्या अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात सख्ख्या बहिणी, त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना यांचा समावेश होता. या अपघाताचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावरील अपघातचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची मागणी केली. नेहमी काही ठिकाणी अपघात का होतात, याची तपासणी करण्याची मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली...वाचा सविस्तर...

- माहुलमधील प्रदूषण करणाऱ्या दोन कंपन्यांना स्थलांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत आज केली. माहुल आणि आजूबाजूच्या परिसरातील रासायनिक उत्सर्जन व वायू प्रदूषणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. स्थानिक रहिवाशांना प्रदूषणामुळे श्वसनविकार व अन्य आजार जडल्याची खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. हरित लवादाने एजीस लॉजिस्टिक्स लिमिटेड व सीलॉर्ड कंटेनर्स लिमिटेड या कंपन्यांनांवर ठपका ठेवला. त्यांना 10 हजार कोटीचा दंड ठोठावला होता. मात्र, तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी याबाबत कार्यवाही केली नाही. म्हणून विद्यमान मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाई करून या कंपन्या स्थलांतरित करा, अशी मागणी शेलार यांनी केली.

- शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले...वाचा सविस्तर...

- शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी अजित पवार म्हणाले की, राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचे चारित्र्य चांगले ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. लोक आमच्याकडे 'पब्लिक फिगर' म्हणून पाहतात. राजकीय मते वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरे असू शकतात. मात्र, कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केले नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचे स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. 'दूध का दूध, पाणी का पाणी' झाले पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे.

- कांदा उत्पादकांसाठी प्रतिक्विंटल तीनशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छगन भुजबळ यांनी ही नुकसान भरपाई प्रतिक्विंटल पाचशे रुपये देण्याची मागणी केली. सरकार कमी रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला...वाचा सविस्तर...

- राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोडाला पाने पुसली जात आहेत. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहेत. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

- शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याविरोधात आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली...वाचा सविस्तर...

- जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्य सचिवांनी आज बैठक बोलावली आहे. योजनेबाबत तोडगा न निघाल्यास 14 मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत, यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी प्रशासन चर्चा करणार आहे. यावर यात कर्मचारी, शिक्षक संघटनांचा सहभाग असणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

- एकीकडे तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त असतांना शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडल्याने शेतकऱ्यांचे गव्हु, मका, हरभरा,भाजीपाला, फळबागा आदीचे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या कृषी मंत्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकट्या सिल्लोडमध्ये 3 जणांनी जीवन संपविले. नैतिक जबाबदारी घेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...