आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:विधानसभेच्या अधिवेशनाचे सूप वाजले, मुख्यमंत्र्यांनी दिले अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
राहुल गांधींवर केलेल्या कारवाईविरोधात विरोधकांनी आज तोंडाला काळ्या फिती बांधून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. - Divya Marathi
राहुल गांधींवर केलेल्या कारवाईविरोधात विरोधकांनी आज तोंडाला काळ्या फिती बांधून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आज विरोधक काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तर न ऐकताच विरोधकांकडून राहुल गांधींच्या मुद्द्यावरुन सभात्याग करण्यात आला.

अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांनी उत्तर न ऐकताच सभागृहातून पळ काढला. काही लोक सभागृहाबाहेर स्टंट करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्यात उत्तर ऐकण्याचे धाडस नाही, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

LIVE

 • राहुल गांधींवर केलेल्या कारवाईविरोधात आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मुक आंदोलन केले. 'लोकशाहीची हत्या', असे पोस्टर विरोधकांच्या हातात होते. तसेच, हाताला व तोंडाला काळ्या फितीही बांधण्यात आल्या होत्या.
 • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह मविआचे अनेक आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
 • विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले होते. त्याचा निषेध करत विरोधकांनी जोडे मारणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

विधानभवनात रणकदंन:राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे, अजित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण

 • काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, गुरुवारी शिवसेना व भाजपच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले. त्यानंतर आम्ही तातडीने विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार करत जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र, अद्याप या आमदारांवर कारवाई झालेली नाही. या आमदारांवर कारवाई करण्याची विधानसभा अध्यक्षांची इच्छा दिसत नाही. विधानसभा अध्यक्षांचे वर्तन हे पक्षपाती दिसत आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग केला. वाचा सविस्तर
 • आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आंदोलन कसे असावे याचे संकेत आहे. दोन दिवसापूर्वी घडलं ते अत्यंत दुर्दैवी होती. राहुल गांधींविरोधात ज्या पद्धतीने घोषणाबाजी सुरू होती ती अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत आणि आमच्याकडे पायताणे आहेत हे विसरू नका. कडक कारवाई अध्यक्षांनी करावी असा आग्रह धरला होता. अध्यक्षांचा वेळकाढूपणा सुरू आहे. त्यांनी निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजेत. अध्यक्ष टाळाटाळ करताना दिसत असून आम्ही निषेध करत आहोत. या सगळ्या कारणांमुळे आम्ही सभात्याग केला आहे. “
 • ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, मला आमदार होऊन काही वर्षेच झाली आहेत. तरीही सत्ताधाऱ्यांचे अशा प्रकारचे वर्तन मी कधीही पाहीले नाही. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राला सुसंस्कृत अशी परंपरा लाभली आहे. मात्र, या परंपरेला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांवर विधानसभा अध्यक्षांची कारवाई करण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळेच आम्ही सभात्याग केला.
 • मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने बाकी आहेत. मात्र, अजूनही हे वर्ष उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी व मराठवाड्यासाठी 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
 • मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार आज सरकारवर संतापले. विधिमंडळाबाहेरील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे. त्यांना याविषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी. वाचा सविस्तर
 • मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणारा कॅगचा अहवाल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सादर केला. त्यावर आदित्य ठाकरेंनी घणाघाती शब्दांत टीका केली. आताचे सीएम म्हणजे करप्ट मॅन आहेत. त्यांच्याकडे हिंमत असेल तर मुंबई पालिकेप्रमाणे ठाणे, नाशिक व राज्यातील इतर महापालिकांची चौकशी करून दाखवावी, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना दिले.
 • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २४ कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. ही अकादमी सूरू करण्यासाठी पर्यटन विभागाच्या जागेचे हस्तांतर करण्याबाबत एमटीडीसीसोबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन लवकरच ही अकादमी सुरू करण्यात येईल अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली.
 • राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून तसेच त्या सभासदांना निलंबित करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नाही.

लोकपाल विधेयकासाठी सरकारची धावाधाव

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकपाल विधेयक समंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. बैठकीला दोन्ही सभागृहाचे गटनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती उपस्थित राहणार आहेत.

हे वृत्त सातत्याने अपडेट होत आहे...

हेही वाचा,

भाजपवर हल्लाबोल:चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, देशात अमृतकाल नव्हे आतंककाल वाटावा, अशी स्थिती; ठाकरे गटाची टीका

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी ज्या ‘अमृतकाला’चा उल्लेख केला त्या अमृतकालात रोज विषाचे फवारे उडत आहेत. न्यायालये, स्वातंत्र्य व लोकशाहीची मानहानी सुरू आहे. मोदीकाल हा अमृतकाल नसून हुकूमशाहीचा आतंककाल वाटावा अशी स्थिती आहे. वाचा सविस्तर