आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाला मोठा दिलासा:जास्तीचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे होणार सोपे; मंत्रिमंडळाचा निर्णय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राह्य धरले जात नव्हते. त्यामुळे पावसाळ्यातील अतिवृष्टी तसेच इतर वेळी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

थेट आर्थिक मदत जाहीर करता येणार

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत जाहीर करणे सरकारला शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीपातील अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले. मात्र, सरकारी नियमानुसार अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत जाहीर करता येत नव्हती. अनेक निकषांची पूर्तता करुन ही मदत जाहीर केली जायची. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासही बराच वेळ लागायचा. मात्र, तोपर्यंत शेतकरी पुरता कोलमडून जायचा.

शेतकऱ्यांना दिलासा
मात्र, सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती निश्चित केल्याने नुकसानग्रस्त पिकांसाठी भरपाईची एक रक्कम निश्चित केली जाईल व त्यानुसार नुकसानग्रस्तांना सरकारकडून थेट आर्थिक मदत जाहीर केली जाईल. सरकारच्या निर्णयामुळे आता पावसाळ्यातील अतिवृष्टी व इतर हंगामातील अवकाळी पाऊस हे दोन्ही नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंत्रिमंडळातील इतर निर्णय

  • सुधारित रेती धोरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता रेती लिलाव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता स्वस्त दरात वाळू व रेती उपलब्ध होईल, असा दावा राज्य शासनाने केला आहे.
  • नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत 43.80 किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे.
  • अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार
  • अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
  • देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
  • महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
  • नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना
  • सेलर इन्स्टीट्यूट "सागर" भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण

संबंधित वृत्त

तडाखा:अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; राज्यात 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवर नांगर; मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान

राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यात सगळ्यात जास्त तोटा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा झाला. या भागात 60 हजार 258 हेक्टरच्या पिकावर अवकाळी पावसाने नांगर फिरवला. मात्र, अजूनही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत तरी काही निर्णय होणार का, याची उत्सुकता आहे. वाचा सविस्तर